जवळपास तीन आठवड्यांपासून ‘नॉट रीचेबल’ असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे किमान आता तरी हे दोघे सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संतोष साळवी आणि देशपांडे यांच्या गाडीच्या चालकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, संदीप देशपांडे, संतोश धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना काही अटी घालून दिल्या आहेत.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३५३ चा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे दोघे नॉट रीचेबल होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात केला होता. गेल्या १५ दिवसांपासून शिवाजी पार्क पोलीस आणि गुन्हे शाखेची टीम त्यांच्या शोधात होती.

नेमकं काय घडलं होतं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं होतं. यानुसार राज्याच्या विविध भागात मनसे कार्यकर्त्यांकडून असे प्रयत्न होत होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत होते. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी ४ मे रोजी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली. भेट घेऊन बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

शिवतीर्थाच्या समोरून जेव्हा संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना पोलीस ताब्यात घेत होते, तेव्हा इनोव्हा गाडीतून ते पलायन करत असताना रोहिणी माळी नावाच्या महिला कॉन्स्टेबल धक्का लागून जमिनीवर पडल्या. पीआय कासार यांच्या पायावरून त्यांची गाडी गेली. तेव्हापासून हे दोघे नॉट रीचेबल आहेत. यादरम्यान मुंबई पोलिसांच्या टीमनं गोव्यापर्यंत जाऊन त्यांचा शोध घेतला होता.

…तर जामीन होऊ शकतो रद्द!

दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं काही अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट समाविष्ट आहे. चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत हजेरी लावण्याची अट लागू असण्याची शक्यता आहे. जर या अटीचं उल्लंघन झालं, तर जामीन रद्द करण्यासाठी पोलीस पुन्हा अर्ज करू शकतात, असं देखील प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक महिन्यात दोनदा लावावी लागेल हजेरी

“येत्या २३ तारखेला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस स्थानकात त्यांना हजेरी लावायची आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला १ आणि १६ तारखेला सकाळी ११ ते २ या कालावधीत त्यांना शिवाजी पार्क पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांसोबत तपासात सहकार्य करायचं आहे”, असं देखील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.