मुंबईः खासगी आस्थापनासाठी आरोग्यविषयक परवाना देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकाला अटक केली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी स्वच्छता निरीक्षकाला यापूर्वी तक्रारदाराने दोन लाख रुपये दिले होते. पण आणखी अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सरबजीत सिंह करतारसिंह बाजवा असे अटक करण्यात आलेल्या स्वच्छता निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणातील तक्रारदारांची खासगी कंपनी असून त्या कंपनीद्वारे ते व्यावसायिकांना आरोग्यविषयक परवाना, इमारत परवानगी व इतर सरकारी कार्यालयात आवश्यक परवानगी काढून देण्याकरीता सल्लागार म्हणून काम करतात. तक्रारदारांच्या सांताक्रुझ येथील एका ग्राहकाच्या आस्थापनेसाठी आरोग्यविषयक परवान्याची आवश्यकता होती. त्यानुसार तक्रारदारांनी महापालिकेच्या एच/पूर्व विभागात जाऊन स्वच्छता अधिकारी बाजवा यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तक्रारदारांना ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले व त्यापूर्वी दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी ऑनलाईन अर्ज करून बाजवा यांना दोन लाख रुपये दिल्याचे तक्रारी सांगितले. त्यानंतर तक्रारदारांना ऑनलाईन आरोग्यविषयक परवाना प्राप्त झाला. लोकसेवक व एका वैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या आस्थापनेची पाहणी केली. त्यावेळी तक्रारदारांना ऑनलाईन मिळालेला परवाना चुकीचा असून त्याबाबत तक्रारदारांना कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने महापालिकेतील एच/पूर्व विभागात जाऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी व बाजवा यांची भेट घेतली. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्याने परवान्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदारांनी पूर्वी दोन लाख रुपये दिल्यामुळे उर्वरित तीन लाख रुपये लाच देण्यास सांगितली. परंतु तक्रारदारांना लोकसेवकांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १४ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग येथे जाऊन तक्रार केली.
तक्रारीच्या अनुषंगाने १५ मे रोजी एसीबीने याप्रकरणाची पडताळणी केली. त्यावेळी बाजवा यांनी कामासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे कबुल केले. त्यानंतर गुरूवारी (५ जून) एसीबीने सापळा रचून दोन लाख रुपये स्वीकारताना बाजवा यांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.