शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या हे लोकांना ब्लॅकमेल करून, ईडी-सीबीआय अशा तपास यंत्रणांच्या धमक्या देऊन खंडणी वसूल करतात, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. तसेच या प्रकरणांमधील सौदे थायलंड आणि बँकॉकमध्ये होत असल्याचाही आरोप राऊतांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“ईडी-सीबीआयच्या धमक्या देऊन थायलंड बँकॉकमध्ये पैसे घेण्याचे सौदे”

संजय राऊत म्हणाले, “अजून अनेक प्रकरणं समोर येतील. लोकांना ब्लॅकमेल करून, ईडीच्या, तपास यंत्रणेच्या धमक्या देऊन कोणी कोठे पैसे घेतले आणि थायलंडला कोणी पैसे जमा करायला लावले हे देखील लवकरच समोर येईल. आधी इथं आरोप करायचे, दबाव आणायचा, ईडीच्या, सीबीआयच्या, तुरुंगात धमक्या द्यायच्या आणि मग सौदा करण्यासाठी थायलंड बँकॉकमध्ये व्यवस्था करायची, तिथं पैसे स्विकारायचे अशी अनेकांची अनेक प्रकरणं आता समोर येतील.”

“धमक्या देऊन परदेशात पैसे कोण स्विकारत होतं हे देखील बाहेर येईल”

“आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्हा सगळ्यांवर कोणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही आणि कोणाच्या कंबरेखाली वार करायचे नाहीत असे संस्कार आहेत. आम्ही असे वार केले नाहीत. सुरुवात तुम्ही केली तरी आम्ही संयम बाळगतोय, पण धमक्या देऊन परदेशात पैसे कोण स्विकारत होतं हे देखील हळूहळू बाहेर येईल. आधी या प्रकरणाचा निकाल लागू द्या,” असं म्हणत संजय राऊत यांनी सोमय्यांना इशारा दिलाय.

संजय राऊत म्हणाले, “पोलीस तपास करत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण भाजपा सरकार करतं त्याप्रमाणे राजकीय सुडापोटी केलेलं नाही. त्या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही. भोसले नावाचे निवृत्त लष्करी अधिकारी तक्रारदार आहेत. त्यांनी तक्रार दाखल केलीय. कोणी किती पैसे गोळा केले, पैसे गोळा करून काय विनियोग केला हा पोलीस तपासाचा भाग आहे.”

“११ हजार की ५८ कोटी पैसे जमा झाले याचा तपास पोलीस करतील”

“गेल्या काही वर्षापासून भाजपाचे लोक आमच्यासारख्यांवर आरोप करतात अशाप्रकारचा हा आरोप नाही. हवेत काहीही बोलायचं आणि भ्रम तयार करायचं असं हे नाहीये. त्यांनी पैसे गोळा केलेत आणि ५८ कोटीचा आकडा समोर आलाय. ११ हजार की ५८ कोटी पैसे जमा झाले हा पोलीस तपासाचा भाग आहे. आम्ही राजकीय सुडापोटी कारवाई करत नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा : “मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती, त्यामुळे…”, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोकांना कायद्यापासून पळू नका सांगणारे आता **** पाय लावून…”

“तुमच्या मनात काही भीती नसेल तर पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. ते अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करत आहेत. ते पळत आहेत, भूमिगत होत आहेत. ते महान नेते आहेत, त्यांनी अनेकांच्या भ्रष्टाचारावर हल्ले केलेत. कायद्यापासून पळू नका यासाठी त्यांनी लोकांना प्रेरणा दिलीय आणि तेच **** पाय लावून पळत आहेत. असं पळू नका असं माझं आवाहन आहे,” असं म्हणत राऊतांनी सोमय्यांना टोला लगावला.