पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या प्रकाराची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. भाजपाकडून या प्रकारावरून काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली जात असताना पंजाबमधील काँग्रेस सरकार या सगळ्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकारावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्यांनी या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या मागणीबाबत देखील माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्वीट करून त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे”, असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आंदोलकांनी रस्ता अडवल्याने मोदींचा ताफा अडकून पडला; रद्द करावी लागली सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय झालं होतं पंजाबमध्ये?

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. यावेळी हुसैनीवाला शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर एका फ्लायओव्हरवर मोदींचा ताफा अडकून पडला. पुढे काही शेतकरी आंदोलन करत असल्यामुळे हा ताफा अडकून पडल्याचं समोर आलं. यावेळी पंतप्रधान तब्बल १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये एवढी मोठी कसूर झाल्याचा मुद्दा आता भाजपाकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.