महाराष्ट्र सदन आणि अन्य घोटाळ्यांप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवरील कारवाईचे फास दिवसेंदिवस आवळले जाताना दिसत आहेत. समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनीने सहा कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीचा बडगा उभारण्यात आला आहे. बँकेकडून यासाठी वृत्तपत्रात नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिकमधील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या समीर आणि पंकज यांच्या जमिनी आणि मुंबईतल्या विविध भूखंडावर बँकेने प्रतिकात्मक स्वरूपाची जप्ती आणली आहे. याशिवाय, ३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा स्टेट बँकेकडून देण्यात आला आहे. कालच सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी अशोका बिल्डकॉन आणि भुजबळ फाऊंडेशन यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी अशोका बिल्डकॉनच्या मुख्यालयासह संचालकांचे निवासस्थान आणि पिंपळगाव बसवंतच्या येथील टोल नाक्यावर छापे टाकले होते.



