मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत सातत्याने केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेस पक्षाने आतापर्यत अनेक वेळा या विषयावरून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तकार केली असून एकाही पत्राचे उत्तर पालिका प्रशासनाने कॉंंग्रेसला दिलेले नाही.

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून महापालिका वर्तुळात राजकारण तापू लागले आहे. मुंबई कॉंग्रेसने दर आठवड्याला मुंबई महापालिकेतील विविध घोटाळे बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत घोळ असल्याची तक्रार कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत यांनी पालिका आयुक्तांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट मिळावे याकरीता अटी-शर्तींमध्ये बदल केले जातात, त्याकरीता केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले जाते, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

सावंत यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पालिका आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात मिठी नदीच्या एका कामाच्या निविदेत घोळ असल्याचा आरोप केला आहे. या कामासाठी १७०० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदेतील पंप उत्पादक कंपनीच्या उलाढालींची ५० कोटी रुपयांची मर्यादा आधी होती. मात्र बोलीपूर्व बैठक झाल्यानंतर ही मर्यादा २१० कोटी करण्यात आली. अचानक हा बदल केल्याने अनेक कंपन्या पात्र ठरणार नाहीत.

केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निविदेत नमूद केलेले निकष पुढे कठोर करता येत नाहीत. मात्र मुंबई महापालिकेत अटी शिथिल करण्याऐवजी अधिक कठोर केल्या जातात. त्यामुळे ठराविक कंत्राटदारच त्यामध्ये पात्र ठरतात, असाही आरोप सावंत यांनी केला आहे.

भांडूप येथील २००० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदेत प्रकाशित करण्यात आलेले पूर्व पात्रता निकष हे बोलीपूर्व बैठकीनंतर अधिक कठोर कसे करण्यात आले. ९१० एमएलडी क्षमतेच्या पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदेत प्रकाशित करण्यात आलेले काम बोलीपूर्व बैठकीनंतर अनेक महिन्यांनी बदलून त्याची व्याप्ती वाढवली. याचीही आठवण सावंत यांनी करून दिली. याबाबत सावंत यांनी पालिका आयुक्तांना दोन पत्रे पाठवली होती. मात्र अद्यापही एकाही पत्राचे उत्तर मिळालेले नाही, असा आरोप सावंत यांनी केला आहे.