विविध ठिकाणी गुरुवारी सकाळपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा तसेच हार्बरवरील प्रवाशांना बसला. रात्री ८ नंतर ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकलचे वेळापत्रक पुरते कोलमडले आणि १०० हून अधिक लोकल फेऱ्या विस्कळीत झाल्या. काही फेऱ्या विलंबाने धावत होत्या, तर काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे रात्री कामावरून निघालेले प्रवासी मध्यरात्रीनंतर घरी पोहोचले. दरम्यान, आज (शुक्रवार) सकाळपासून पावसाने ताल धरल्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिट विलंबाने धावत आहेत. पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणेत पाणी शिरल्याने सीएसएमटी, मशीद रोड, भायखळा, दादर ते परेल, तसेच हार्बरवरील गोवंडी, वडाळा आदी स्थानकादरम्यानच्या गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास सिग्नल यंत्रणा कोलमडली. त्यामुळे सीएसएमटी दिशने येणाऱ्या आणि कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या. मात्र सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे बराच वेळ कुर्ला ते सीएसएमटी स्थानक दरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पुढील प्रवास फारच रेंगाळला. पारंपरिक पद्धतीने सिग्नल यंत्रणा हाताळताना रेल्वे कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. त्यासाठी बराच वेळ लागल्याने लोकल अर्धा ते एक तास विलंबाना धावत होत्या. सीएसएमटी ते ठाणे दरम्यान धीम्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी एरवी एक तास लागतो. मात्र या प्रवासासाठी गुरुवारी रात्री पावणेदोन तास लागत होते. त्यामुळे कल्याण आणि त्यापुढील स्थानक गाठण्यासाठी काही प्रवाशांना मध्यरात्र झाली. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गांवरही अशीच परिस्थिती होती.

सिग्नल समस्येमुळे मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवरील ९८ लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या, तर १५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज सकाळपासून पडत असलेल्या पावसानंतर मध्य रेल्वेवरील लोकल दहा ते पंधरा मिनिट विलंबाने धावत आहेत. मात्र पश्चिम उपनगरीय रेल्वे सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.