scorecardresearch

अकरावीच्या ६६ टक्के जागा रिक्त; दोन फेऱ्या पूर्ण;  महाविद्यालय मिळाल्यानंतरही साडेतीन हजार  विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ 

अकरावीच्या दोन केंद्रीय प्रवेश फेऱ्यांनंतरही मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या वर्गाच्या ६६ टक्के जागा रिक्त आहेत.

अकरावीच्या ६६ टक्के जागा रिक्त; दोन फेऱ्या पूर्ण;  महाविद्यालय मिळाल्यानंतरही साडेतीन हजार  विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ 
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अकरावीच्या दोन केंद्रीय प्रवेश फेऱ्यांनंतरही मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या वर्गाच्या ६६ टक्के जागा रिक्त आहेत. दरम्यान, दुसऱ्या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांनीही प्रत्यक्ष प्रवेश घेतला नाही.  दुसऱ्या फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता विशेष फेऱ्यांची वाट पाहावी लागणार आहे.

 अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दोन नियमित फेऱ्या आतापर्यंत झाल्या. यंदा मुंबई महानगरात केंद्रीय फेरी आणि कोटय़ातील जागा मिळून ३ लाख ७१ हजार ३७५ जागा उपलब्ध आहेत. त्यावर आतापर्यंत एकूण १ लाख २७ हजार ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. जवळपास ६६ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. अर्ज केलेल्या १ लाख ६५ हजार ३४५ विद्यार्थ्यांनी अद्यापही कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चत केलेला नाही. त्यामुळे यंदाही प्रवेश प्रक्रियेत विशेष फेऱ्यांची जंत्री कायम राहणार आहे.

 दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी १ लाख ६२ हजार ५०७ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. त्यातील २४ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले आहेत. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही ३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चत केलेला नाही. पहिल्या फेरीत ६७ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले  होते.

कोटय़ातील प्रवेशाची स्थिती..

मुंबई महानगर प्रदेशातील २ हजार ७८ महाविद्यालयात अल्पसंख्याक, संस्थांतर्गत आणि व्यवस्थापन कोटय़ातील १ लाख ४० हजार ४२५ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत ३५ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी कोटय़ांतर्गत प्रवेश निश्चित केला असून १ लाख १ हजार ३९ जागा रिक्त आहेत. आतापर्यंत ४ हजार ३७ जागा महाविद्यालयांनी केंद्रीय प्रवेश फेरीत समर्पित केल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.