मुंबई: ठाण्यातील अभियंता रवींद्र वर्मा (२७) याला भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याने मुंबई गोदीतील युद्धनौका व पाणबुड्यांची संवेदनशील माहिती, रेखाचित्र व ऑडिओ नोट्स स्वरूपात दिल्याचे चौकशीत समजले आहे. त्याबदल्यात त्याच्या बँक खात्यात परदेशातूनही रक्कम जमा झाली आहे. ती रक्कम पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचा संशय आहे. याबाबत दहशतवाद विरोधी पथक अधिक तपास करत आहे.

फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तान ‘इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह’ला मुंबई नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याच्या आरोपाखाली कळव्यात राहणारा अभियंता रवी वर्मा याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपी नवी मुंबईतील बेलापूर येथील खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत होता. तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरवते. त्यामुळे आरोपी नौदल गोदीत कामानिमित्त जात होता. त्यामुळे आरोपीकडे नौदल गोदीचे नकाशे व छायाचित्र होते. आरोपीने समाज माध्यमावरून आरोपीच्या संपर्कात असलेल्या तरुणीला ते दिले. ती पाकिस्तानी गुप्तचर असल्याचा संशय आहे. हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नौदल गोदीमध्ये मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळे तो गोदीतून बाहेर आल्यावर तेथील माहिती गुप्तचरांना पाठवायचा. रवींद्र वर्मा नौदल गोदीतून बाहेर आल्यावर रेखाचित्र, आराखडे आणि ‘ऑडिओ नोट्स’द्वारे पाकिस्तानी गुप्तचरांना पाठवायचा, असे सूत्रांनी सांगितले.

२०२४मध्ये तरुणीशी ओळख

●आरोपीची ओळख नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकवर तरुणीशी झाल्याचे उघड झाले. तिने आपण भारतातच राहत असल्याचे वर्माला सांगितले होते. पण प्रत्यक्षात ती तरुणी पाकिस्तानी गुप्तचराशी असल्याचा संशय आहे. नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान या आरोपीने व्हॉट्सअॅपद्वारे छायाचित्रे व नकाशे पुरवल्याचे उघड झाले.

●या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथक, पोलीस ठाणे येथे अटक आरोपी व त्याच्या संपर्कातील इतर दोन अशा एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आरोपी तरुणाशी संपर्क करणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे. त्याव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीची माहिती मिळाली असून तोही पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. पण तपासानंतरचा हा सर्व प्रकार स्पष्ट होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी अटक आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.