‘लोकसत्ता-दुर्गा पुरस्कार २०२०’चा निकाल तयार झाला असून अडचणींवर मात करून उत्तुंग यश मिळविणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने सर्वाना विधायक कार्याची प्रेरणा देणाऱ्या या नऊ कर्तबगार स्त्रियांची ओळख ‘लोकसत्ता’मधून येत्या शनिवारपासून दसऱ्यापर्यंत करून दिली जाईल.
‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२०’साठी आपल्या परिसरातील ‘दुर्गा’ची माहिती पाठवण्याचे आवाहन ‘लोकसत्ता’मधून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खेडय़ापाडय़ांत काम करणाऱ्यांपासून शहरात आधुनिक जीवन जगणाऱ्यांपर्यंतच्या ३५०हून अधिक कर्तबगार स्त्रियांची माहिती वाचकांनी ‘लोकसत्ता’कडे पाठवली. यातील काही स्त्रियांनी वैयक्तिक पातळीवर संकटांचा धैर्याने सामना करत त्यावर मात केली होती, तर काही खूप व्यापक स्वरूपात समाजोपयोगी काम करणाऱ्या होत्या.
डॉ. स्नेहलता देशमुख गेली ६० वर्षे वैद्यकीय सेवेचे व्रत निभावत असून एक उत्तम सर्जन असण्याबरोबरच या क्षेत्रातील उत्तम गुरू म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्राबरोबर शिक्षणक्षेत्रातही त्यांचं मानाचं स्थान असून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद त्यांनी भूषवले आहे. डॉ. नीलम गोऱ्हे या १९८४ पासून स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या कामात महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. तसेच १९९६ पासून त्यांचा क्रांतिकारी महिला संघटनेत सक्रिय सहभाग आहे. महिला सक्षमीकरणासाठीच्या अनेक आंदोलनांत सहभागी झालेल्या नीलम गोऱ्हे यांचा स्त्री चळवळीचा मोठा अभ्यास आहे. प्रतिमा कुलकर्णी यांनी प्रायोगिक रंगभूमीवरील अभिनयापासून आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. ‘आत्मकथा’ या नाटकाद्वारे त्यांनी १९८८ मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले. नाटकांबरोबरच चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरही त्यांनी दिग्दर्शिका, पटकथा आणि संवाद लेखिका म्हणून यशस्वी वाटचाल केली. अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
परीक्षक मंडळ..
यंदा या पुरस्काराचे सातवे वर्ष असून परीक्षक म्हणून ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. स्नेहलता देशमुख, प्रदीर्घ काळ सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि दिग्दर्शन, पटकथालेखन आणि अभिनय या सर्वच क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी यांनी या ‘दुर्गा’ची निवड करण्याचे कठीण काम पार पाडले.
प्रायोजक
प्रस्तुती : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन
पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., यश कार्स , राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स लि.
