लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: कुर्ला पश्चिम येथील एका एसआरए इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतीत अडकलेल्या ५० ते ६० जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र धुरामुळे घुसमटलेल्या ३९जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालय परिसरात डॉ भीमराव रावजी आंबेडकर ही गृहनिर्माण इमारत असून शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. इमारतीला आग लागताच रहिवाशांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक रहिवासी ईमारतीत अडकले होते.

आणखी वाचा-मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शासकीय कर्मचाऱ्यांची निदर्शने; संरक्षण देणारी तरतूद रद्द

विनोबा भावे नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ व्या मजल्यापर्यंत जाऊन इमारतीत अडकलेल्या ३० ते ३५ जणांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र धुरामुळे घु समटल्याने ३९ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चार जणांना कोहिनुर रुग्णालयात आणि इतर ३५ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील चौघांना घरी सोडण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून व्ही. बी. नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत