मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यानंतरही मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मंगळवारी हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतर भागात मात्र पावसाची शक्यता नाही. दरम्यान, शक्ती चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून मंगळवारी या प्रणालीचे रुपांतर कमी दाब क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता असली तरी चक्रीवादळाचा कोणताही प्रभाव नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास काही भागातून सुरू झाला आहे. मात्र, मागील १० दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर आहेत. मोसमी वाऱ्यांची सीमा सोमवारी वेरावल, भरुच, उज्जैन, शहाजानपूर आणि झाशी भागात होती. आणखी चार – पाच दिवसांत मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज आहे. राज्यात सध्या पावसाची शक्यता नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. अन्यथा दिवसभर ढगाळ वातावरण राहील. दरम्यान, मुंबईसह ठाणे भागात मंगळवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र जास्त पाऊस पडणार नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसतील, असे हवामान विभागाने सांगितले. याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. मुंबईतही मागील दोन – तीन दिवसांपासून कोरडे हवामान आहे. याचबरोबर ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्याची जाणीव आणखी होते. मुंबईत तापमानाचा पारा सरासरीऐवढा असला तरी मुंबईकर उकाड्यामुळे हैराण झाले आहे.
बुलढाणा येथे सर्वाधिक तापमान
बुलढाणा येथे सोमवारी सर्वाधिक तापामानाची नोंद झाली. तेथे ३४ अंश सेल्सिअस तापामान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला येथे ३३.२ अंश सेल्सिअवस, ब्रह्मपुरी ३२.२ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ येथे ३२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या तुलनेत चंद्रपूर आणि गोंदिया येथे कमी तापमानाची नोंद झाली आहे.