मुंबई : भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर युतीत लढून ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवसेनेचे १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर असले तरी शिंदे गटासाठी भाजप किती जागा सोडणार, हे अद्याप जाहीर नसल्याने या खासदारांचे भवितव्यही अधांतरी आहे.

भाजपने देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सोमवारी महाराष्ट्रात चंद्रपूर औरंगाबाद येथे आले होते. त्यांनी संघटनात्मक बैठका व सभाही घेतल्या. भाजपने लोकसभेसाठी ४५ आणि विधानसभेसाठी २०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. भाजपने शिंदे गटाबरोबर युतीत लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविण्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्यात जागावाटपाची चर्चा झालेली नाही. शिंदे यांच्याबरोबर १३ खासदार असून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असली तरी भाजपने तशी घोषणा केलेली नाही. या मतदारसंघांसह सर्वच जागांवर भाजपने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिंदे गटाला १३ खासदारांच्या जागा तरी मिळणार का, की विद्यमान खासदारांनाही डच्चू मिळणार, गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने लढविलेल्या जागा शिंदे गटाला मिळणार का, याबाबत अनिश्चितता आहे.

आम्ही लोकसभेसाठी ४५ तर विधानसभेसाठी २०० हून अधिक जागा जिंकण्याची तयारी करीत असून बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर युतीत लढू.-चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.