Sanjay Shirsat : वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विशेष करून आदित्य ठाकरेंसाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“आदित्य ठाकरेंनी वरळीत केलेल्या विकासाचा हा परिणाम आहे. जे वारंवार सांगतात ना वरळी गड माझा आहे, तो गड खऱ्या अर्थाने सुनील शिंदेंनी राखला होता. तो सचिन आहिरांचा गड होता. बाहेरून येऊन यांनी जे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला, त्या नेतृत्वाला आता ते लोक सुद्धा कंटाळले आहेत.” असं संजय शिरसाट यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटले आहे.
याशिवाय, “आज तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना भेटायलाही आदित्य ठाकरेंकडे वेळ नाही. त्याच्या उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रात्री दोन वाजता सुद्धा भेटतात. हे महाशय थोडे बिझी आहेत, पर्यावरणामध्ये थोडे बिझी आहेत. पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी कुठे अजून बाकीच्या ठिकाणी काय लफडे करत असतील, त्यामध्ये बिझी असतील. म्हणून हे कार्यकर्ते आता कंटाळले आहेत. ३० तारखेनंतर अत्यंत मोठी रांग ही आमच्याकडे आलेली तुम्हाला दिसेल.” असा दावाही संजय शिरसाट यांनी यावेळी केला.
याचबरोबर “जो शिवसेनाप्रमुखांचा विचार होता, आता तो संपला आहे. हे मनोमनी शिवसैनिकांनी आता गृहीत धरलेलं आहे. म्हणून त्यांचा प्रवाह हा आता आमच्याकडे येतोय.” असंही संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितलं.