मुंबई : विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेनेचे दोन्ही गट, मंत्री पंकजा मुंडे, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील तसेच धम्मचक्र संमेलन असे सहा मेळावे वा संमेलनाच्या माध्यमातून समर्थकांना विचारांचे सोने लुटण्याची संधी मिळणार आहे. रा. स्व. संघ शताब्दी वर्षात पदार्पण करीत असताना सरसंघचालक मोहन भागवत हे कोणता संदेश देतात याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मुख्यालय नागपूरमध्ये विजयादशमीला दरवर्षी संचलन केले जाते. या वेळी सरसंघचालक स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतात. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षाला उद्यापासून सुरुवात होत असून यानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभर करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शताब्दी वर्षात पदार्पण करीत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाची उत्सुकता आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. ठाकरे गटाचा मेळावा पारंपरिक शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाने दसरा मेळावा गोरेगावमध्ये आयोजित केला आहे. आगामी मुंंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग यानिमित्ताने दोन्ही गटाकडून फुंकले जाईल. शिवसेना- मनसे युतीबाबत उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडतात याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे. राज ठाकरे हे शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. पण मनसेबाबत उद्धव ठाकरे हे भूमिका स्पष्ट करतील.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही गुढीपाडवा, दसरा, अक्षयतृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन केली नव्हती. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातील तो साडेचारावा मुहूर्त असेल. मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. नेहमीप्रमाणेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यावर एकनाथ शिंदे हे त्यांच्या मेळाव्यात भाषणासाठी उभे राहतात. ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना शिंदे प्रत्युत्तर देतात. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाची आहे. उद्धव व राज ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक फटका शिंदे गटाला बसेल.

मराठवाड्याकडे लक्ष

मराठवाड्यातील दोन मेळावे लक्ष वेधून घेणारे आहेत. मराठा समाजाला आोबीसी समाजातून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात आरक्षणावर कोणती भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे.

मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट वार्षिक दसरा मेळावा आयोजित केला आहे. पाच वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या पंकजा मुंडे या वंजारी समाजाला संदेश देणार आहेत.

दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ या वर्षी नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापण दिन सोहळा साजरा केला जातो. यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. मुख्य अतिथी म्हणून धम्म लर्निंग केंद्र सारनाथ उत्तर प्रदेशचे भदन्त चन्दिमा थेरो, उत्तर प्रदेश येथील भन्ते विनाचार्य, डॉ. राज शेखर वृंड्र, स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची उपस्थिती राहणार आहे.