शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीर शुभेच्छा दिल्या. यात ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’, असं म्हटलं होतं. यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राने शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी दिली. मात्र, आता या बातमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत म्हणाले, “सामना दैनिकात ३ जुलै २०२२ रोजी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयीची बातमी अनावधानाने छापण्यात आली होती. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत.” याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडून माहिती कळवल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यानंतर सामना दैनिकात शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी देण्यात आली. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे आदेश दिल्याचंही म्हटलं. आढळराव पाटलांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असा आशय आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते.

हकालपट्टीच्या बातमीवर आढळराव पाटील काय म्हणाले?

शनिवारी रात्री ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाले. पुणे जिल्ह्यातील शिवसनेचे काही पदाधिकारी आपणास रविवारी भेटण्यासाठी येत आहोत आणि स्वत: मी दोन दिवसानंतर भेटीसाठी येणार आहेत. असे यावेळी ठरले होते. या संभाषणात ठाकरे यांनी, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छांबद्दल विचारले होते. त्याविषयीचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर, काही तासातच माझी पक्षातून हकालपट्टी होते, असे कसे होऊ शकते, असा मुद्दा आढळराव यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून असे पत्रक प्रसिद्धीला देण्यात आल्याची कल्पना पक्षप्रमुखांना नसावी, अशी शक्यताही आढळरावांनी व्यक्त केली. तथापि, अधिक भाष्य केले नाही.

हेही वाचा : “विरोध का करता, जीवे ठार मारू”; एकनाथ शिंदेंच्या ‘पीए’वर शिवसेना नेत्याला धमकी दिल्याचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातून सलग तीन वेळा आढळराव खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून आढळराव आणि राष्ट्रवादीत जोरदार शीतयुध्द सुरू आहे. गेल्याच आठवड्यात पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्यासमोर त्यांनी शिवसैनिकांची खदखद मांडली होती. त्यानंतर, आता नूतन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.