मुंबई: विरोधी पक्षातील तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार निधी मिळत नसल्याची तक्रार करीत असताना माजी आमदार सदा सरवणकर यांनी आमदार नसतानाही आपल्याला २० कोटींचा निधी मिळत असल्याचा वादग्रस्त दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम आपल्या पाठीशी उभे आहेत. पण आमदार नसतानाही माझी कामे सुरू आहेत, असे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. माहीम विधानसभा क्षेत्रातील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. मी जरी आता आमदार नसलो तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत. याच पाठिंब्यामुळे मला अनेक विकासकामे करता येत आहेत. मी आमदार नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आमदार नसतानाही कामे सुरू आहेत. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक इमारतीत कामे केली आहेत. कामाचे राजकारण करणारे लोक हतरता आणि जातीपातीचे राजकारण करणारे लोक निवडून येतात. विद्यमान आमदारांना विकासकामांसाठी २ कोटी रुपये मिळतात, पण मी आमदार नसतानाही मला २० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, असे सदा सरवणकर म्हणाले.
हा कोणता न्याय आहे? – आमदार महेश सावंत
जी व्यक्ती पराभूत झाली आहे अशा व्यक्तीला सरकार २० कोटींचा निधी उपलब्ध करून देते याचा अर्थ जनतेच्या कौल मिळून जो आमदार निवडून आला आहे त्याला कमी दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. कोणतेही वैधानिक पद नसताना सरकार कोणत्या आधारावर माजी आमदाराला निधी देत आहे. विद्यमान आमदाराला विकासकामांसाठी केवळ ५ कोटींचा निधी मिळातो आणि माजी आमदाराला २० कोटींचा निधी दिला जातो हा कोणता न्याय आहे, असा सवाल महेश सावंत यांनी केला. यातील किती निधी खरोखरच जनतेच्या कामांसाठी खर्च झाला आणि किती निधी खिशात घातला गेला, याचा हिशेब कोण लावणार? माजी आमदाराकडे सरकार हिशोब मागणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. सिद्धिविनायक मंदिराच्या विकासकामांसाठी आलेल्या निधीचीही अशाच प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली आहे. आम्ही आता गल्लोगल्ली फलक लावून निधी गेला कुठे? हा सवाल करणार आहे. जनतेच्या पैशाचा हा अपव्यय सुरू असल्याची टीका महेश सावंत यांनी केली.