मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या विरोधात अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे राय यांनी ३५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असून त्यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. खंडणीतील पाच लाख रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम प्रकल्पाबाबत ३५ लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक कमलेश राय यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, कमलेश राय यांनी यापूर्वीच खंडणीच्या पहिल्या टप्प्यात ८ लाख रुपये स्वीकारले होते. शुक्रवारी, ज्यावेळी ते आणखी ५ लाख रुपये घेण्यासाठी आले, तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राय हे कंत्राटदाराला धमकावत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तुझ्याकडे आवश्यक परवानग्या नाहीत, तुला काम करू देणार नाही, अशा धमक्या कंत्राटदाराला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी राय यांना ८ लाख रुपये दिले होते, पण त्यानंतरही धमकावणे सुरूच राहिल्यामुळे अखेर कंत्राटदाराने याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली.
प्रकणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बांधकामाच्या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी पाच लाख स्वीकारण्यासाठी राय तेथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांनी कंत्राटदाराच्या तक्रारीवरून याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आणखी कोणी या खंडणीप्रकरणात सहभागी होते का? याचाही तपास सुरू आहे.
माजी नगरसेवक कमलेश राय यांनी मार्च २०२३ मध्ये शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला होता. राय पती-पत्नी अंधेरी विमानतळ परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागातून गेली किमान २२ वर्षे निवडून येत आहेत. कमलेश राय हे तीन वेळा, तर त्यांची पत्नी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडणून आल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत कमलेश राय यांची पत्नी सुषमा राय या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. कमलेश राय पूर्वीपासून शिवसेनेत होते, मात्र संजय निरूपम यांनी शिवसेना सोडली तेव्हा राय यांनीही शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. मात्र मधल्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. उत्तर भारतीय समाजाचे प्रश्न सुटत नव्हते. त्यामुळे आपण शिवसेनेतून (ठाकरे) बाहेर पडल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.