scorecardresearch

महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर…; संजय राऊतांचा भाजपाला इशारा; म्हणाले “पेटवापेटवीतील तज्ज्ञ कोण…”

उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नका; संजय राऊतांचा इशारा

Shivsena, Sanjay Raut, Tipu Sultan,
उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नका; संजय राऊतांचा इशारा

आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील तज्ज्ञ कोण आहेत हे सर्वांना माहित आहे. पण आम्ही हे करत नाही असा सूचकवजा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी असा वाद पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपाने सर्वात प्रथम राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा असं सांगितलं आहे.

भाजपा नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “मग सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचं गुणगाण गात गौरव केला होता. योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी भाजपाने त्यांचा राजीनामा घ्यावा”.

टिपू सुलतान नावावरुन सुरु असलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भाजपाने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा…”

“टिपू सुलतानचं काय करायचं ते सरकार पाहून घेईल. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही. तुम्ही कशाप्रकारे इतिहास लिहिताय, बदलताय…अगदी दिल्लीत कसा नव्याने इतिहास लिहायला घेतला आहे हे आम्हाला माहिती आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हा सगळा इतिहास आम्हाला सांगण्याची गरज नाही,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

“मुंबईत काय करायचं त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार समर्थ आहे. काळजी कऱण्याचं कारण नाही. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नका,” असंही यावेळी ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut on controversy over tipu sultan name in mumbai sgy

ताज्या बातम्या