मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात गेल्या आठवड्यात आणखी एक वातानुकूलित लोकल दाखल झाली आहे. रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात तयार झालेली ही लोकल मध्य रेल्वेवरील सहावी लोकल आहे. सध्या सेवेतील सामान्य लोकल ऐवजी या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार मध्य रेल्वेकडून होत आहेत.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात पाच वातानुकूलित लोकल असून त्यापैकी चार लोकल सेवेत असतात, तर एक लोकल राखीव ठेवली जाते. सध्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा दरम्यान वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत आहेत. या लोकलच्या दररोज ५६ फेऱ्या होतात. यातील काही लोकल फेऱ्यांना चांगला प्रतिसाद आहे. अल्प प्रतिसादमुळे हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल सेवा बंद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर आता आणखी एक वातानुकूलित लोकल ताफ्यात दाखल झाली आहे. या लोकलची वैशिष्ट्ये ताफ्यात असलेल्या इतर वातानुकूलित गाड्यांसारखीच आहेत. चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात त्याची बांधणी झाली आहे. मेल, एक्स्प्रेसचे इंजिन जोडून वातानुकूलित लोकल मुंबईत गेल्या आठवड्यात दाखल झाल्याची माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. मध्य रेल्वे मार्गावर सामान्य लोकलच्या सध्या सुरु असलेल्या दहा ते बारा फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्याचा विचार प्रशासन करत आहे. मात्र या नवीन लोकलचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही.