मुंबई : राज्यातील काही महापालिकांनी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला असला तरी मुंबई महापालिकेने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही. मात्र मुंबई महापालिकेचा देवनार येथील पशुवधगृह यंदा स्वातंत्र्यदिनी बंद राहणार आहे. परंतु, मांस आणि मासे विक्री सुरू राहणार आहे. अन्य महापालिकांमध्ये स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांसविक्री बंद राहणार असली तरी मुंबईतील खवय्यांना मात्र बाजारात मासे व मांस मिळू शकणार आहे.

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला खाटीक समाजाने विरोध केला आहे. तसेच मांसाहारींनीही या निर्णयाला विरोध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मटण व मांस विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश पालिका प्रशानाने काढला होता. त्यामुळे या वादाला सुरुवात झाली होती. मात्र कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयानंतर अन्य महापालिकांनीही अशीच बंद लागू केली आहे. मालेगाव, जळगाव, नागपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांंनीही हद्दीतील कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र मुंबई महापालिकेने याबाबत कोणतेही आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे मुंबईत स्वातंत्र्यदिनी मांस व मासे मिळणार की नाही असा प्रश्न मांसाहारी खवय्यांना पडला आहे.

याबाबत मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, स्वातंत्र्यदिनी मुंबई महापालिकेचा देवनार येथील कत्तलखाना बंद राहणार आहे. मात्र गोकुळाष्टमीमुळे तो बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह दरवर्षी काही ठराविक दिवशी बंद असते. त्यात गोकुळाष्टमी हा दिवसही आहे. यंदा स्वातंत्र्यदिनी गोकुळाष्टमी असून त्यानिमित्ताने हा कत्तलखाना बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, मांस विक्री व मासे विक्रीची दुकाने सुरू राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई महापालिकेने स्वातंत्र्यदिनी मासे विक्रीवर बंदी घातलेली नाही आणि अशी विक्री घातल्यास आम्ही खपवूनही घेणार नाही, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला आहे.

वर्षभरात १५ दिवस पशुवधगृह बंद

मुंबईत सर्व धर्मिय वास्तव्यास असून देवनारच्या पशुवधगृहातून मुंबईच्या बाहेरही मांसविक्री होत असते. त्यावर अनेकांचा रोजगार अवलंबून असतो. मुंबईतील सर्व धर्मिय समाजातील अनेक समुदायाचे मासे व मांस रोजचे अन्न आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ९ ऑक्टोबर २०१५ रोजी एक ठराव केला होता. त्यानुसार वर्षभरातील १५ दिवस देवनार पशुवधगृह बंद ठेवता येते. त्याअंतर्गत गणेशचतुर्थी, गोकुळाष्टमी, जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वातील एक दिवस या दिवसांचा समावेश आहे.