मुंबई : पालिका प्रशासनाने या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील १६ हजारांहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. तर गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्यात येणार आहेत. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असते. यंदा पावसाळ्या मुंबईतील रस्त्यांवर खड्डे दिसू लागले असून पालिका प्रशासनाने यंदा विशेष काळजी घेतली होती.

पालिकेच्या एकूण २२७ प्रभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दुय्यम अभियंते नेमण्यात आले आहेत. पावसाळ्यादरम्यान रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे २४ तासांच्या आत संबंधित अभियंते व कंत्राटदारामार्फत खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने १९ अभियंत्यांना नोटीसा धाडल्या होत्या. त्यावर अभियंत्यांच्या संघटनेने नाराजीही व्यक्त केली होती. कंत्राटदार खड्डे बुजवत नाहीत, असाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने कंत्राटदारांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून आतापर्यंत एकूण ५० लाख ५३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत १६ हजारांहून अधिक खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. यंदा जूनपासून महापालिका हद्दीतील रस्त्यांवर १६ हजार ६४५ ठिकाणी खड्डे पडले होते. त्यापैकी १६ हजार ५६२ ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा – पाणीपुरवठ्याच्या तक्रारी तातडीने निवारण करा, मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

हेही वाचा – झोपडीधारकांच्या दुर्दशेबाबत उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून ऑगस्ट महिन्यापासून अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी मुंबईतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी मुंबईत खड्डे भरण्याची मोठी मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसजर्न मिरवणुकींच्या मार्गावरील खड्डे प्रामुख्याने बुजवले जाणार आहे. पावसाने सध्या उघडीप दिली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत असावेत याकरीता अभियंत्यांची बैठक घेऊन लवकरच खड्डे भरण्याबाबत निर्देश दिले जातील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.