सोसायटीच्या पार्किंगच्या जागेत कोणाची गाडी उभी करायची, कोणाची नाही यावर सातत्याने होणाऱ्या वादावादीला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. पार्किंगच्या जागेवरून होणाऱ्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच नियमावली लागू होणार आहे. तसेच मोबाइल टॉवर आणि जाहिराती यांच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नांचे सभासदांमध्ये वाटप करावे लागणार आहे. यासंदर्भात सहकार विभागानेच पुढाकार घेतला आहे.
गाडय़ांच्या पार्किंगवरून अनेक सोसायटय़ांमध्ये होणारे वाद ही नित्याचीच बाब झाली आहे. बहुतांश ठिकाणी सोसायटीचे व्यवस्थापन मंडळ मनमानीपणे ही मोकळी जागा सभासदांना पार्किंगसाठी देते. तर काही ठिकाणी जुने विरुद्ध नवे सभासद असा वाद उफाळून येतो. अनेकदा हे तंटे न्यायालयापर्यंत जातात. या सर्व पाश्र्वभूमीवर पार्किंगच्या जागेवरच्या तोडग्यासाठी एक आदेशच जारी करण्याचा निर्णय सहकार व नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सोसायटीवर मोबाइल टॉवर लावायचा असेल तर ७० टक्के सभासदांची मान्यता आवश्यक असेल. तसेच टॉवर आणि जाहिराती यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातील निम्मा वाटा सभासदांना समान पद्धतीने द्यावा लागेल. टॉवर वा जाहिरात फलकासाठी कंत्राट देताना होणारा करारनामा आणि मिळणाऱ्या निधीचा विनियोग याचीही माहिती सभासदांना द्यावी लागणार आहे.
दरम्यान, सहकार विभागातील अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे. एका अधिकाऱ्याला एका जिल्ह्य़ात दोन व महसुली विभागात तीन नियुक्त्या मिळतील. बदल्यांबाबत नव्याने स्थापन झालेल्या आस्थापना मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

तोडगा असा असेल..
सोसायटीच्या मोकळ्या जागेवर सर्वाचा समान हक्क.सोसायटी व्यवस्थापनाने ही जागा सर्वाना विभागून द्यावी
जागा कमी असल्यास आळीपाळीने पार्किंगसाठी उपलब्ध करावी
सोसायटीच्या सामूहिक सभागृहाच्या वापराबाबतही वेगळ्या तरतुदी