scorecardresearch

शिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी  

शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आपण नोंदवलेल्या तक्रारीनुसार खार पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, असा आरोप करत हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी फटकारले.

शिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी  
किरीट सोमय्या ( संग्रहित फोटो )

न्यायालयाने फटकारले; याचिकाही निकाली

मुंबई : शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आपण नोंदवलेल्या तक्रारीनुसार खार पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, असा आरोप करत हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी फटकारले. त्यानंतर सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पुरवणी जबाब नोंदवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे न्यायालयाने सोमय्या यांची याचिका निकाली काढली.

खार पोलीस ठाण्याच्या आवारात शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर आपण पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप करून सोमय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. शिवसेना कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी प्राथमिक तपास अहवालात (एफआयआर) फेरफार केल्याचा आरोप करून सोमय्या यांनी पोलिसांवरही कारवाईची मागणी केली होती. एवढेच नव्हे, तर प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्याचीही मागणी केली होती.

 न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्याच तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीमागील उद्देश काय? गुन्हा रद्द केला तर काय होईल ? असा प्रश्न न्यायालयाने सोमय्या यांना केला. दुसरीकडे सोमय्या यांचा नव्याने जबाब नोंदवण्यास पोलीस तयार असल्याचे सरकारी वकील संगीता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर याचिकेतील अन्य मागण्यांचा आग्रह आपण धरणार नसल्याचे सोमय्यांतर्फे न्यायालयाला सांगितले. तसेच पोलिसांत दुसऱ्यांदा जबाब नोंदवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे न्यायालयाने सोमय्या यांची याचिका निकाली काढली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या