१८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश

मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी हजार राहण्याचे आदेश देऊनही शिवसेना खासदार संजय राऊत शिवडी न्यायलयासमोर सोमवारी हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांच्या नावे जामीनपात्र वॉरन्ट बजावून त्यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.

न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी मेधा यांच्या तक्रारीची दखल घेतली होती आणि राऊत यांना समन्स बजावून सोमवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या नावे जामीनपात्र वॉरन्ट बजावून त्यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.

नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे महानगर किंवा न्यायदंडाधिकारी फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करतात. त्याचाच भाग म्हणून प्रतिवादीला न्यायालयात हजर राहावे लागते. शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ व १६ एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला, असे मेधा यांनी तक्रारीत म्हटले आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही मेधा यांनी केला आहे.