मुंबई : ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा कीर्तन रत्नांमधून ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले विजेते ठरले. त्यांना वीणेच्या स्वरूपातील चांदीचे आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाला विचारवंत, लेखक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले होते. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून एकूण १०८ कीर्तनकार ‘सोनी मराठी’ वाहिनीने शोधून आणले होते. प्रत्येक भागात त्यापैकी ३ कीर्तनकारांनी चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर केली. या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ‘सोनी मराठी’ वाहिनीने दोन दिग्गज कीर्तनकार व परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील व ह.भ.प. राधाताई सानप यांच्यावर सोपविली होती.
ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील, ह.भ.प.प्रमोद महाराज डुकरे, ह.भ.प. हर्षद महाराज भागवत, ह.भ.प. सोमनाथ महाराज बदाले, ह.भ.प. कल्याणी महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज लटपटे हे सहा जण ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. या सगळ्यांच्या सुमधुर कीर्तन सादरीकरणाने सोहळ्यात चांगलीच रंगत आणि चुरस निर्माण झाली होती. या सर्वांमधून ह.भ.प. सोमनाथ महाराज बदाले यांनी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला आहे.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमातील प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. या मंचाने मला आत्मविश्वास दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे ह.भ.प. राधाताई सानप आणि ह.भ.प. जगन्नाथ महाराज या गुरूंकडून खूप काही शिकायला मिळाले. ‘सोनी मराठी’ वाहिनीने हा मंच खुला करून दिल्याबद्दल त्यांचाही मी ऋणी आहे,’ असे विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना ह.भ.प. सोमनाथ महाराज बदाले म्हणाले.