मुंबई : बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत जवळचे भाडे नाकारल्याप्रकरणी सुमारे ३२ हजार ई-चालान जारी करण्यात आले आहेत. त्या सर्व वाहनांचे परवाने निलंबीत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : ‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे स्थानक, मॉल, बस स्थानक व इतर ठिकाणी रिक्षाचालक लांबपल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी नजिकचे भाडे नाकारत असल्याची तक्रार वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे ८ ते २२ एप्रिल या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत एकूण ५२ हजार १८९ विविध कारवाया करण्यात आल्या. भाडे नाकारल्याप्रकरणी ३२ हजार ६५८ कारवाया, तर विनागणवेश रिक्षा चालवल्याप्रकरणी पाच हजार २६८ कारवाया करण्यात आल्या. क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी आठ हजार ६५० व इतर प्रकरणात पाच हजार ६१३ कारवाया करण्यात आल्या. या सर्व कारवायांमध्ये ५२ हजार १८९ ई – चलन जारी करण्यात आले. विशेष म्हणजे भाडे नाकारल्याबद्दल कारवाई करण्यात आलेल्या सर्व ३२ हजार ६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.