लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कोकण पट्ट्यात शिमगा आणि गणेशोत्सव या सणांना विशेष महत्त्व आहे. मुंबईस्थित कोकणवासीय होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबईस्थित कोकणवासीयांची रेल्वेगाडीचे तिकीट आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी – मडगाव, एलटीटी – मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटीवरून ६ मार्च, १३ मार्च रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी अनुक्रमे ७, १४ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून ६ मार्च, १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सोडण्यात येणार असून ही रेल्वेगाडी त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २४ डबे असतील. प्रथम श्रेणीचा एक डबा, प्रथम आणि द्वितीय श्रेणीचा एकत्र एक डबा, द्वितीय श्रेणीचे दोन डबे, तृतीय श्रेणीचे १० डबे, शयनयान चार डबे, जनरल चार डबे, एसएलआरचे दोन डबे असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव १३ मार्च, २० मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी अनुक्रमे १४ मार्च आणि २१ मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी १४ मार्च, २१ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी २२ मार्च रोजी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २० डबे असतील. प्रथम श्रेणीचा एक डबा, द्वितीय श्रेणीचे दोन डबे, तृतीय श्रेणीचे सहा डबे, शयनयानचे आठ डबे, पॅन्ट्री कारचा एक डबा, जनरेटर कारचे दोन डबे असतील. या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे दिली.