स्थानिक पातळीवरील प्रश्नांना स्थानिक भाषेत उत्तरे देणारा ‘स्पीच बॉक्स’ आयआयटी बॉम्बेच्या तंत्रमहोत्सवाचे आकर्षण ठरत आहे. गावपातळीवर आरोग्यसेवांची माहिती देणे, छोटय़ा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मदत करणे यासाठी ही प्रणाली वापरता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयआयटी बॉम्बेच्या तंत्रमहोत्सवाला आलेले पाहुणे, विद्यार्थी यांना आयआयटीच्या परिसरातील ठिकाणे आणि इतर माहिती शोधण्यासाठी ‘स्पीच बॉक्स’ मदत करत आहे. आयआयटीच्या रचना विभागात (स्कूल ऑफ डिझाइन) पदवी घेतलेल्या डॅनीने हा ‘स्पीच बॉक्स’ तयार केला आहे.

अलेक्स, गूगल टॉक, गूगल मॅपसारख्या प्रणाली आपले अनेक प्रश्न सोडवतात. मात्र गल्लीबोळातला पत्ता शोधायचा असेल किंवा परिसरातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर या वैश्विक प्रणाली तोकडय़ा ठरतात. ‘स्पीच बॉक्स’ स्थानिक गरजा लक्षात घेऊन उत्तरे देतो. मुंबईतील धारावी परिसरात हे बॉक्स रस्त्यावर बसवून त्याची चाचणी घेण्यात आली.

हिंदी, मराठी किंवा जेथे बॉक्स बसवायचा त्या भाषेत उत्तरे मिळू शकतील. आजाराबाबत जागृती करण्यासाठी, शाळांमध्ये, पर्यटनस्थळी, रेल्वे, बसस्थानक येथे ही प्रणाली उपयोगी ठरू शकेल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर त्वरित मिळाले नाही, तर त्या प्रश्नासाठी संकेतांक दिला जातो. तो वापरून काही वेळात प्रश्नाचे उत्तर मिळवता येते.

‘प्रत्येक भागातील गरजा वेगळ्या असतात, नागरिकांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. तेथे प्रत्येक वेळी जागतिक प्रणाली उपयोगी ठरत नाहीत. त्याचे उत्तर म्हणून स्पीच बॉक्स तयार करण्यात आला आहे,’ असे डॅनी यांने सांगितले.

अभिनेता होण्याची इच्छा व्यक्त..

रजनीकांतने यंत्रमानवाचा अभिनय केलेल्या ‘रोबो’ चित्रपटातील ‘चिट्टी’ची भूमिका करण्याची इच्छा या यंत्रमानवाला आहे. पाच वर्षांनी अभिनेत्या यंत्रमानवांसाठी ऑस्कर मिळवण्याचे त्याचे स्वप्न आहे. थेस्पियन यंत्रमानवाशी तंत्रमहोत्सवात शनिवारी संवाद साधण्यात आला. अभिनय, नृत्य, गायन, नक्कल यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या यंत्रमानवाच्या सादरीकरणाला उपस्थितांची वाहवा मिळाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speech box that solves native language abn
First published on: 05-01-2020 at 01:25 IST