ओदिशामधील रेल्वे अपघात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे अनेक सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून एसटी महामंडळानेही शनिवारी आयोजित केलेला वर्धापन दिन सोहळा रद्द केला.ओदिशामधील बालासोर जिल्ह्यातील शालिमार- चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी यांची धडक झाली. या अपघातात  २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर, ५०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा >>> ‘पुरावा कायदा’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकांचा भडिमार; मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेतील तृतीय वर्ष सहाव्या सत्र परीक्षेत घोळ

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसची शनिवारी होणारी उद्घाटन फेरी रद्द करण्यात आली. तसेच या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही राज्यभरातील अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा स्थगित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शनिवारी आयोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत. या कार्यक्रममांचे भविष्यात आयोजन करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

हे कार्यक्रम रद्द

– एसटीच्या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन.

– २५ वर्षापेक्षा जास्त सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांचा सत्कार.

– करोना महामारीनंतर गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिले तीन विभांग व २५० आगारापैकी गटनिहाय ९ आगारांचा सन्समान.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध बसस्थानकांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ. – एसटीच्या ७५ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या ‘एसटी विश्वरथ’ या वातानुकूलित फिरत्या बसचे उद्घाटन.