एसटी कामगारांच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर व पत्रकारपरिषद संपवून आझाद मैदानावर पोहचलेल्या सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलक कामागारांमध्ये जाऊन, बैठकीबाबत त्यांना माहिती दिली आणि त्यानंतर आपण आपली अंतिम भूमिका ही आज रात्रभर विचारमंथन व चर्चा करून, उद्या सकाळी माध्यमांसमोर जाहीर करणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांच्या गराड्यात जाऊन सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, “त्या पत्रकारपरिषदेला आम्ही होतो. सरकारने मांडलेला प्रस्ताव आम्ही सविस्तरपणे ऐकून घेतला आणि त्यानंतर आम्ही भूमिका घेतली, की आम्ही आझाद मैदानावर जाऊन कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू आणि मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू. त्यामुळे कोणत्याही कामगाराने आपलं वेगळं मत मांडू नये. आम्ही तुमच्या बरोबर आहोत,जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण सगळे मिळून विचार करून घेऊयात. आपला निर्णय झाल्यानंतर उद्या सकाळी माध्यमांशी बोललं जाईल.”

माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, “ आम्ही सरकारचा निर्णय ऐकलेला आहे. आता आम्ही कामगारांसोबत बसून चर्चा करून आमची भूमिका ठरवणार आहोत. आम्ही सर्व कामगारांसबोत सगळ्या बाजुंचा विचार करू आणि उद्या आमचा निर्णय जाहीर करू. आम्ही आमची भूमिका अजून जाहीर केलेली नाही, आम्हाला आमच्या कामगारांची भूमिका जाणून घ्यावी लागेल. कामगारांशी मोठी संख्या असल्याने गटागटाने चर्चा करावी लागणार आहे. रात्रभर आम्ही विचारमंथन करणार उद्या निर्णय अंतिम करणार. सरकारची भूमिका आम्ही नीट तपासू, निश्चतपणे यातून कामगारांना काय लाभ होणार आहे, कामगारांचं भविष्य या सगळ्यावर आम्हाला विचार करावा लागेल. ”

अखेर एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघाला! परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा मुद्दा राज्यात चर्चेचा ठरला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली होती. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाचा देखील राज्य सरकारला सामना करावा लागत होता. इतर मागण्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, ही प्रमुख मागणी केली होती. त्यानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र झाल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St workers agitation brainstorming on governments proposal tonight the role will be announced tomorrow morning sadabhau khot msr
First published on: 24-11-2021 at 20:01 IST