मुंबई : राज्यातील विविध अशासकीय अनुदानित कला संस्थांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध पदविका आणि प्रमाणपत्रे अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये तब्बल १० हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ५ हजार ३०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता १५ हजार ४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. ही वाढ साधारण तीन दशकांनी करण्यात आली आहे.

राज्यातील विविध अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते. वेतनाव्यतिरिक्त आस्थापना चालवण्यासाठी येणारा उर्वरित १० टक्के खर्च संस्थांनाच उचलावा लागतो. हा खर्च विद्यार्थी भरत असलेल्या शुल्कातून भागवला जातो. पण गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी शुल्कात वाढ झालेली नाही. त्या तुलनेत वीज देयक, आणि इतर खर्च वाढले आहेत. ही तूट मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक कला संस्था आर्थिक गर्तेत जात होत्या.

त्यामुळे पुण्याच्या भारतीय कला प्रसारिणी सभेने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान देण्याची किंवा अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत सुधारणा करत उर्वरित १० टक्के तूट भरून काढण्याची मागणी केली होती. या मागणीवर विचार करत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शुल्क रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारणेमुळे विविध १२ प्रकारच्या पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या शुल्कात १० हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुधारित शुल्क लागू

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सुधारित शुल्क लागू होणार आहे. या सुधारित शुल्कातील १५ हजार ४०० रुपयांपैकी १४,४०० रुपये अशासकीय कला महाविद्यालयांना वेतनावरील १० टक्के तूट आणि इतर खर्च भरून काढण्यासाठी वापरता येईल. तर उरलेले १००० रुपये शासनाकडे जमा करावे लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अभ्यासक्रमांचे शुल्क वाढले

फाउंडेशन डिप्लोमा इन आर्ट ॲण्ड डिझाईन, कला शिक्षक पदविका, रेखा व रंगकला पदविका, उपयोजित कला पदविका, शिल्पकला व प्रतिमानबंध पदविका, कला व हस्तकला- अंतर्गत गृहसजावट पदविका, कला व हस्तकला- वस्त्रकाम, कला व हस्तकला- मातकाम, कला व हस्तकला- धातूकाम, कला शिक्षणशास्त्र पदविका, आर्ट मास्टर प्रमाणपत्र या अभ्यासक्रमांचे शुल्क वाढले आहे.