मुंबई : राज्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे साक्षीदार असलेल्या मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सह्याद्री अतिथीगृहाचे नूतीनकरण करणार असून या कामासाठी येत्या १५ दिवसांमध्ये निविदा मागविण्यात येण्याची शक्यता आहे. या कामासाठी १३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मलबार हिल येथे १० हजार ९१० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर १९९४ मध्ये तब्बल २० कोटी रुपये खर्च करून अत्यंत देखणे असे सह्याद्री अतिथीगृह उभारण्यात आले. या इमारतीत २० निवासी खोल्या, बैठकांसाठी सभागृह यासह विविध सुविधांचा समावेश आहे. सह्याद्री अतिथीगृहातून अथांग सागराचे सुंदर असे दृश्य दृष्टीस पडते. मुंबई दौऱ्यावर येणाऱ्या देश – विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सह्याद्री अतिथीगृहात वास्तव्यास असतात. तसेच महत्त्वाच्या सरकारी बैठका याच अतिथीगृहात होतात. या अतिथीगृहाच्या देखभाल – दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे.

हेही वाचा… “मुंबईला ज्यांनी १५ वर्षे ओरबाडले, लुटले तेच आता…” १ जुलैच्या मोर्चावरुन मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

हेही वाचा… मुंबई: दोन हजारांच्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने एक कोटीला गंडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सह्याद्री अतिथीगृहाला २५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. दरम्यान, अतिथीगृहाची आवश्यकतेनुसार डागडुजी केली जाते. करोनाकाळात दीड कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून अतिथीगृहाची डागडूजी करण्यात आली होती. डागडुजीनंतर सहा महिन्यांतच छताचा भाग कोसळला होता. त्यामुळे डागडुजीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता या अतिथीगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नूतनीकरणासाठी १३ कोटी रुपये निधीस मंजुरी देण्यात आली असून या कामासाठी १५ दिवसांत निविदा काढण्यात येणार आहेत. नूतनीकरणाच्या कामाचे नेमके स्वरूप काय असेल हे निविदा प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.