मुंबई : ‘ महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ ’ अंतर्गत ‘ मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड ’ योजना राबविण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली जाईल. पुढील पाच वर्षात सव्वा लाख उद्योजक आणि ५० हजार नवउद्यमींना (स्टार्टअप) मान्यता देण्यात येईल. राज्यातील आयटीआयमध्ये तंत्रशिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे २० अभ्यासक्रम १५ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येतील, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

शासनाकडे तंत्रशिक्षण घेतलेल्या ३० लाख युवक-युवतींची नोंद आहे. त्यांची कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन परीक्षा घेतली जाईल आणि पाच लाख जणांची निवड होईल. मूल्यांकन चाचण्या, स्पर्धा व हॅकेथॉनच्या माध्यमातून पुन्हा चाळणी करून एक लाख उमेदवारांची निवड केली जाईल. अंतिम टप्प्यात २५,००० निवडक उमेदवारांना त्यानंतर तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक, स्टार्टअप्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

नवीन धोरणाची अंमलबजावणी राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत केली जाणार असून महाराष्ट्राला भारतातील सर्वात गतिशील व भविष्यवेधी स्टार्टअप केंद्र म्हणून उभारण्याचा उद्देश आहे. शहरी, ग्रामीण, महिला आणि युवा उद्योजकांसह सर्व क्षेत्रांतील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि वंचित समुदायांवर लक्ष केंद्रित केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना वित्तीय संस्थांच्या भागीदारीतून पाच ते दहा लाख रुपयांचे कर्ज सहाय्य दिले जाईल. त्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल.

मुंबईत खाशाबा जाधव क्रीडा महाकुंभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे’ आयोजन १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. त्यात मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पुन्हा वैभव मिळवून देणार आहे.

पारंपरिक खेळांच्या या क्रीडा महाकुंभात कब्बडी, खो-खो, लगोरी, लेझीम, रस्सीखेच,मल्लखांब, पावनखिंड दौड, कुस्ती,पंजा लढवणे, विटी-दांडू,दोरीच्या उड्या, फुगडी आणि योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष गटातील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला इथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात ही जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन लोढा यांनी केले आहे.

आयटीआय मध्ये २० नवीन अभ्यासक्रम

राज्यभरातील आयटीआय मध्ये लघु कालावधीचे २० नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून तांत्रिक शिक्षणाबरोबरच इतर अनुशंगिक व्यक्तिमत्व विकासाचे अभ्यासक्रम १५ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्यासाठी अधिक कौशल्य प्राप्त होईल. आयटीआय मध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील बिझनेस अॅनालिटिक्स हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम, मार्केटिंग मॅनेजमेंट तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम,प्रॉडक्शन मॅनेजमेंट साडे तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम,फायनान्शियल मॅनेजमेंट तीन महिने कालावधी, बिहेव्हियरल मॅनेजमेंट साडे तीन महिने कालावधींचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.सॉफ्ट स्किल्स मध्ये अॅडव्हान्स्ड कम्युनिकेटिव इंग्लिश अॅण्ड प्रोफेशनल स्किल्स ट्रेनर तीन महिने कालावधी,फंडामेंटल्स ऑफ कॉन्टेन्ट रायटिंग तीन महिने,कम्युनिकेटिव इंग्लिश ट्रेनर तीन महिने,पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अॅण्ड ग्रूमिंग साडे तीन महिने, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.