मुंबई: ‘हिंदी चित्रपट सध्या जगभरात पाहिले जातात. अगदी हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्गसुध्दा हिंदी चित्रपट आवडीने पाहतात’ असे सांगत अभिनेत्री करीना कपूर खान हिने परदेशातील स्पिलबर्ग यांच्याबरोबरच्या भेटीचा किस्सा उपस्थितांना ऐकवला. ‘वेव्हज’ परिषदेत ‘सिनेमा : द सॉफ्ट पॉवर’ या परिसंवादात करीना कपूर खान आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचलन निर्माता – दिग्दर्शक करण जोहर यांनी केले.
हिंदी चित्रपट आता जगभरात पाहिले जातात आणि त्याचा प्रभावही त्यांच्यावर पडतो, असे मत व्यक्त करतानाच करीनाने स्वत:ला आलेले अनुभव कथन केले. ‘परदेशात एका रेस्टॉरंटमध्ये प्रसिध्द हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी मला पाहिले. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारले, ‘तीन एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट असलेल्या चित्रपटातील ती तरुण मुलगी तूच आहेस का?’ मी त्यांना हो सांगितल्यानंतर ‘थ्री इडियट्स’ चित्रपट आपल्याला खूप आवडला असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांनी माझा चित्रपट पाहावा यासाठी मी इंग्रजी चित्रपटातच काम करायला पाहिजे असे मला अजिबात वाटत नाही. उलट स्टीव्हन स्पिलबर्गसारख्या दिग्गज हॉलिवूड दिग्दर्शकाने आपला हिंदी चित्रपट पाहिला ही आपल्या चित्रपटांसाठी अभिमानाचीच बाब आहे’ असे तिने सांगितले.
इंग्रजीचे वर्चस्व झुगारून आपल्या भाषेतील चित्रपट जगभरात पोहोचवयला हवेत – विजय देवरकोंडा
एकीकडे हॉलिवूडमध्येही हिंदी चित्रपट कसे पाहिले जातात आणि त्यांच्यावर आपल्या चित्रपटांचा कसा परिणाम होतो हे करीना उत्साहाने सांगत असताना याच परिसंवादात सहभागी झालेल्या अभिनेता विजय देवरकोंडाने मात्र वेगळा सूर लावला. माझ्या विधानामुळे मी अडचणीत येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करत ते म्हणाले की, आपण सगळे जिथे तिथे इंग्रजी भाषेत संवाद साधतो. हे एकप्रकारे पाश्चिमात्य लोकांसाठी सहजसाध्य होणारे यश आहे, ती त्यांची ताकद ठरते आहे. काहीशे वर्षांपूर्वी पाश्चिमात्य लोक आपल्या देशात आले आणि आपल्या सगळ्यांनाच त्यांनी त्यांच्या भाषेत बोलायला-लिहायला लावण्यासाठी पध्दतशीर प्रयत्न केले’ असे स्पष्ट मत विजयने व्यक्त केले.
‘आज हॉलिवूडमध्ये मोठमोठ्या निर्मितीखर्चात चित्रपट बनतात, कारण जगभरात आज इंग्रजी भाषा परिचयाची आहे आणि त्यांचे इंग्रजी भाषेतील चित्रपट सर्रास आपल्याकडून पाहिले जातात. मी चित्रपट केला आणि ब्रॅड पिटने केला तर त्याला माझ्यापेक्षा शंभर टक्के अधिक मानधन मिळेल कारण त्यांच्या भाषेत सर्वाधिक चित्रपट पाहिले जातात. आणि यात माझी काहीही चूक नाही’ असे त्याने सांगितले. आपल्या पूर्वजांनी अधिक खबरदारी घेत आपल्या भाषा सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले असते तर आपल्याला फायदा झाला असता. मात्र, सध्या चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आज आपल्या हातात आहे, जे आपल्याला आपल्या भाषेशी बांधून ठेवते. त्यामुळे या माध्यमाच्या प्रसारासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत’ असे विजय देवरकोंडा याने स्पष्ट केले.