मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’ आणि ‘एमपीएससी’सह विविध महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश संपादनासाठी मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात खुले वैकल्पिक विषय (दोन श्रेयांक) स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे धडे देण्यासाठी भारतीय इतिहास आणि भूगोलाची ओळख, भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण शास्त्र आणि तंत्रज्ञान, एथिक्स, इंटेग्रिटी आणि व्यक्तिमत्व विकास अशा खुल्या वैकल्पिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
या खुल्या वैकल्पिक विषयांना प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्राला २ श्रेयांक मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे एकूण स्तर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम करण्याची कार्यपध्दती, परीक्षेत यश संपादन करण्यासाठी आवश्यक सर्व व्यक्तिमत्व कौशल्यांचा विकास करणे, प्रभावी लेखन कौशल्य आणि प्रभावी संभाषण कौशल्य विकसित करणे व इतर आवश्यक अनुषंगिक बाबीची माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तर सर्व विद्याशाखांतील विद्यार्थी हे खुले वैकल्पिक विषय घेऊ शकतील, लवकरच याबाबत विद्यापीठातर्फे परिपत्रक जारी केले जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या या ओपन इलेक्टीव्हचे नियमन चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत केले जाणार आहे.
तसेच या करारानुसार ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार श्रेयांक देऊ करणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. तसेच, पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी निगडित अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर श्रेयांक मिळणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थित सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, ठाणे महानगरपालिका उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्यासह चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप, सल्लागार डॉ. प्रदीप वाघमारे आदी उपस्थित होते.