स्थलांतर, इतर शिक्षण मंडळांकडे वाढलेला पालकांचा ओढा, कमी झालेला जन्मदर यामुळे मुंबईतील केवळ मराठी, उर्दू, गुजरातीच नव्हे तर इंग्रजीसह सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी सरासरी २० हजारांनी कमी होते आहे. येत्या काळात मुंबईत ठरावीक शाळा वगळता शिक्षकांच्या भरतीला फारसा वाव राहणार नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांअभावी बंद होणाऱ्या शाळांमध्ये केवळ पालिकेच्याच नव्हे, तर अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळांचाही समावेश आहे हे विशेष!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने मुंबईतील सर्व शाळांच्या जमा केलेल्या माहितीनुसार २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत सर्वच प्रकारच्या शाळांची संख्या २,४१९ होती. यापैकी काही शाळांना पालिकेचे तर काहींना सरकारचे अनुदान आहे. तर काही शाळा या पूर्णपणे खासगी तत्त्वावर चालतात. परंतु गेल्या दोन वर्षांत ही आकडेवारी कमी होऊन २,३५३ वर आली आहे. विद्यार्थी संख्याही ९,१२,१२६ वरून ८,६०,७०७ अशी कमी झाली आहे. म्हणजे ५१,४१९ ने कमी झाली आहे. विद्यार्थी कमी झाल्याने आपोआपच त्याचा परिणाम शिक्षकांच्या संख्येवर होऊन गेल्या तीन वर्षांत शाळांमधील त्यांची संख्या १,५७९ ने कमी झाली आहे.
शहरातून वसई-विरार किंवा अन्य उपनगरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होते आहे. परिणामी उपनगरांतील शाळांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. तिथे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही.भरमसाट डोनेशन देऊन पालक प्रवेश घेत आहेत. मुंबईतील शाळांची संख्या घटण्यास हे एक महत्त्वाचे कारण आहे,’ असे ‘महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघा’चे प्रवक्ते प्रशांत रेडिज यांनी सांगितले. ‘याशिवाय मराठी, हिंदी, उर्दू याऐवजी इंग्रजी माध्यमाच्या आणि त्यातही राज्य शिक्षण मंडळाऐवजी सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा ओढा आहे. या शाळांनाही सरकारची ना-हरकतही सहज मिळते. आर्थिक-कौटुंबिक कारणांमुळे शाळेपासून दुरावलेल्या शाळाबाह्य़ मुलांना टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्नही यशस्वी झालेले नाहीत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
पालिका शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे यांनीही या सगळ्याचे खापर पालिकेच्या प्रशासनातील दिरंगाईवर फोडले. ‘मध्यान्ह भोजनापासून गणवेश, छत्री, दप्तर अशा २७ वस्तू देऊनही विद्यार्थी पालिकेच्या शाळांपासून दूर जात आहेत.
कारण आपल्या शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा सुधारण्यात पालिकेला यश आलेले नाही. पालिकेच्या इंग्रजी शाळांची स्थितीही फार चांगली नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील घटलेला जन्मदर हेदेखील एक कारण आहे. इतर शिक्षण मंडळांकडे पालकांचा ओढा वाढल्यानेही राज्याच्या व पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी कमी होते आहे. परंतु या शाळांमध्ये विद्यार्थी राज्याच्या भाषा, इतिहास-भूगोल आदी ज्ञानापासून वंचित राहतात. आयबी किंवा आयजीसीएसईच्या शाळांमध्ये तर थेट ‘ग्लोबल सिटिझन’ बनण्याचे धडे दिले जातात. त्यात भारताच्या भूगोल-इतिहासाचाही समावेश नसतो. यामुळे आपली संस्कृती, मूल्ये हीदेखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. – बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक

वर्ष                        शाळा                  विद्यार्थी               शिक्षक
२०१२-१३               २,४१९                 ९,१२,१२६            २४,५५१
२०१३-१४              २,३६६                   ८,८०,६७८           २३,३०६
२०१४-१५               २,३५३                  ८,६०,७०७           २२,९७२

(स्रोत – महानगरपालिका शिक्षण विभाग)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students shortage in mumbai schools
First published on: 02-11-2015 at 05:20 IST