मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मेपासून सुरु झाली असून अर्ज करण्यासाठी आता आणखी एक संधी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. २६ जूनपर्यंत मुदत होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम पुढील संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी गुरूवार, २६ जूनपर्यंत मुदत होती. सायंकाळपर्यंत तब्बल १ लाख ५० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरले असून त्यापैकी १ लाख ३० हजार ८८५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहे. मात्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या वर्षी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशाच्या चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिला पर्याय, दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन पर्याय, तिसऱ्या फेरीसाठी पहिले सहा पर्याय तर चौथ्या फेरीसाठी सर्व पर्याय अनिवार्य असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश फेरीसाठी महाविद्यालयांचा प्राधान्य अर्ज भरुन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
दहावीचा निकाल जाहीर होताच तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले. दहावीनंतर कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदविका अभ्यासक्रम १० वी नंतर तीन वर्षांचा असतो व हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पात्रतेच्या निकषानुसार विविध शिष्यवृत्ती शासनातर्फे देण्यात येते. पदविका शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात पात्रतेनुसार प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध असते.
तंत्र शिक्षणामध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलामुळे पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये विद्यावेतनासह प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. पदविका प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी तसेच नाव नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी dte.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.