प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई: मुंबईच्या ‘विकास नियोजन आराखडा २०२३’मध्ये उद्यानासाठी आरक्षित असलेला मालाडजवळील मालवणी येथील तब्बल सहा एकर क्षेत्रफळाचा भूखंड मुंबई उपनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेला अटीसापेक्ष हस्तातरित करण्याची तयारी दर्शविली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या भूखंडावरील बांधकामांची पात्रता निश्चिती करण्यात येणार असून भाजपच्या स्थानिक खासदारांनी केलेल्या मागणीनुसार या भूखंडावर नोएडाच्या धर्तीवर ‘वेद वन’ उभारण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. त्यामुळे मालाड मालवणी परिसरात पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांबरोबरच भविष्यात एक थिम पार्कही उपलब्ध होणार आहे.

बोरिवलीमधील मौजे मालवणी परिसरातील २७ हजार ९७२.६४ चौरस मीटर (सुमारे सहा एकर) क्षेत्रफळाचा भूखंड उद्यानासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यापैकी १० हजार ६९६.७७ चौरस मीटर भूखंड अतिक्रमीत आहे. हा भूखंड उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असून ‘मुंबई विकास नियोजन आराखडा २०२३’मध्ये हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित करण्यात आला आहे. उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असलेला हा भूखंड मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावा आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला साजेसे संकल्पना उद्यान तेथे साकारावे. नोएडा येथे उभारण्यात आलेल्या ‘वेद वना’ला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मुंबई महानगरपालिकेने त्याच धर्तीवर मालवणीमध्ये ‘वेद वन’ साकारावे, अशी मागणी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेला मालवणीमध्ये हे उद्यान साकारता यावे यासाठी गेली आठ वर्षे शेट्टी पाठपुरावा करीत होते.

हेही वाचा… ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या प्रचार-प्रसारासाठी तरुणाची मुंबई – लंडन दुचाकीस्वारी

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अटीसापेक्ष मुंबई महानगरपालिकेला हा भूखंड हस्तांतरित करण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र त्यांनी मुंबई महानगरपालिकेला पाठवले आहे. या भूखंडाचे भोगवटामूल्य निश्चित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून राज्य सरकारने निश्चित केलेले भोगवटामूल्य शासनाच्या तिजोरीत जमा करणे महानगरपालिकेसाठी बंधनकारक आहे. या भूखंडाचा वापर मंजूर प्रयोजनासाठीच करावा, भूखंडाचा विकास करताना न्यायालयीन आदेशांचे पालन करावे आदी आठ अटी मुंबई महानगरपालिकेला घालण्यात आल्या आहेत. दरम्यान, भोगवटामूल्य शासनाकडे जमा करणे बंधनकारक राहील असे बंधपत्र घेऊन मालवणीतील या भूखंडाचा ताबा तातडीने मुंबई महानगरपालिकेला द्यावा, ताबा पावती आणि महानगरपालिकेकडून घेतलेले बंधपत्र अनुपालन अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेश विभागीय कोकण आयुक्तांना दिले आहेत. या भूखंडावर १७ झोपड्या, मेट्रोची चार गोदामे आणि अन्य काही बांधकामे आहेत.

हेही वाचा… दलालांची दुसरी परीक्षा ६ ऑगस्ट रोजी; महारेरा नोंदणीसाठी १ सप्टेंबरपासून प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेनेही आता हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भूखंड ताब्यात मिळाल्यानंतर भूखंडावरील बांधकामाची पात्र – अपात्रतेची निश्चिती प्रक्रिया करण्यात येईल. त्याचबरोबर या भूखंडावर नोएडाच्या धर्तीवर ‘वेद वन’ उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मालवणी परिसरातील सुमारे सहा एकर भूखंड ‘वेद वन’ उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मिळावा यासाठी गेली आठ वर्षे पाठपुरावा सुरू होता. अखेर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी हा भूखंड मुंबई महानगरपालिकेला तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला या भूखंडावर ‘वेद वन’ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात मुंबईच्या पर्यटनस्थळांमध्ये एका उत्तम ‘वेद वना’ची भर पडेल, असा विश्वास खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.