मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे कच्चे गुण, उत्तरतालिका आणि सामान्यीकरण सूत्र प्रकाशित करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला दिले आहेत. समुपदेशन प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि जागा अडविण्याच्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि जे. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून नीट-पीजी परीक्षा घेण्यात येते. विविध सत्रांमध्ये ही परीक्षा हाेत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गुणांचे सामान्यीकरण करून संस्थेकडून निकाल जाहीर करण्यात येतो. गुणांच्या सामान्यीकरणाच्या प्रणालीअंतर्गत, एकाच परीक्षेच्या वेगवेगळ्या तारखांसाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. कठीण किंवा सोप्या प्रश्नपत्रिकांचा परिणाम कमी करण्यासाठी, गुणांची गणना करताना एक सामान्यीकरण सूत्र लागू केले जाते. गुणवत्ता यादी सामान्यीकरण सूत्रावर आधारित असते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या २०१८ च्या निर्देशाविरुद्ध उत्तर प्रदेश राज्याने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने नीट-पीजी परीक्षांमध्ये पारदर्शकतेसाठी कच्चे गुण, उत्तरतालिका आणि सामान्यीकरण सूत्रे प्रकाशित करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, नीट पीजीच्या परीक्षेतील गुणांची गणना करताना वापरण्यात येणाऱ्या सामान्यीकरणाच्या सूत्रावर शंका उपस्थित केली जात असल्याने नीट पीजीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून यासंदर्भात सर्वोच्च न्यालयालयात विविध रिट याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. उत्तरपत्रिका प्रकाशित करण्याचे आणि नीट- पीजी परीक्षेचे सामान्यीकरण करण्याबाबत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूत्री एजी मसीह यांच्या खंडपीठासमोर या याचिका सुनावणीसाठी आहेत.