Metro Car Shed at Aarey: मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘आरे’ येथे मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हे मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेतला.

पण अलीकडेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. राज्यात सत्तांतर घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा आरे येथेच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आरे येथे मेट्रो कारशेड उभारण्याबाबत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला आरे येथील झाडे तोडण्याबाबतच्या अर्जाचा ‘ट्री ऑथोरिटी’समोर पाठपुरावा करण्यास परवानगी दिली आहे. तसेच न्यायालयाने ‘ट्री ऑथोरिटी’ला याबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.