लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने नागरिकांना होत असलेल्या मुख कर्करोगाचा सामना करण्यासाठी टाटा रुग्णालयाने ‘महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ तयार केले आहेत. हे योद्धे राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रामध्ये जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. तसेच मुख कर्करोग झालेला रुग्ण आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करणार आहेत. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना टाटा रुग्णालयामध्ये पाठविण्यात येणार आहे.
राज्यामध्ये कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळावेत यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या आरोग्य विभागासह टाटा रुग्णालयाने नुकताच करार केला असून, त्याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कर्करोगावरील उपचार मिळावेत यासाठी ‘सर्वांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरामध्ये कर्करोग उपचार’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. आता टाटा रुग्णालयाने मुख कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, नागरिकांची तपासणी करून वेळेत त्याचे निदान करणे आणि जिल्हा स्तरावर तोंडाच्या कर्करोगावरील उपचार व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ हा उपक्रम हाती घेतला आहे. हा कर्करोग तज्ज्ञांचा एक स्वयंसेवी गट आहे.
या उपक्रमांतर्गत टाटा रुग्णालयातून सुपर स्पेशालिटीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा गट तयार करण्यात आला आहे. हे डॉक्टरच ‘महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ म्हणून ओळखले जाणार आहेत. हे डॉक्टर ते सेवा देत असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी जिल्हा रुग्णालय किंवा आरोग्य केंद्रामध्ये महिन्यातून एकदा किंवा दोनदा भेट देणार आहेत. या भेटीमध्ये ते रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. कर्करोग रुग्ण आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच गरजेनुसार उपचारानुसार त्यांच्यावर केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि प्राथमिक स्वरपातील शस्त्रक्रिया करतील. मात्र या रुग्णाचा कर्करोग हा तीव्र स्वरुपाचा असल्यास त्याला पुढील उपचारासाठी टाटा रुग्णालयामध्ये पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती टाटा मेमोरियल केद्रांचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.
आणखी वाचा-‘आयसिस’प्रकरणी पडघ्यातून एकाला अटक
‘महाराष्ट्र मुख कर्करोग योद्धे’ ही संकल्पना कॅन्सर एपिडेमिओलॉजी सेंटरचे उपसंचालक तसेच हेड अँड नेक कॅन्सर सर्जरीचे प्रोफेसर व हेड अँड नेक ऑन्कोलॉजिक सोसायटीचे संचालक डॉ पंकज चतुर्वेदी यांनी मांडली असून, ती प्रत्यक्षातही आणली आहे. या उपक्रमाला ३१ जुलैपाासून सुरूवात करण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीपाद बनावली यांनी दिली.