मुंबई : वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे अनुपस्थित राहिलेले किंवा अनुत्तीर्ण ठरलेल्या शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनुपस्थित असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

ऑनलाईन प्रशिक्षणाच्या वेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे काही शिक्षकांचे नाव प्रणालीमध्ये योग्यरित्या समाविष्ट झाले नाही, काहींची उपस्थिती नोंद झाली नाही, तर काही शिक्षकांना प्रशिक्षणातून बाहेर पडावे लागले.

या संदर्भात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी सातत्याने संवाद साधला. किरकोळ तांत्रिक त्रुटींमुळे शिक्षकांना वगळणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने शासनासमोर मांडली.

शासनाने २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्हानिहाय व विषयवार प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. या शिक्षकांना पुन्हा नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. यामुळे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील २४१ शिक्षक प्रशिक्षणार्थींना या पुनःप्रशिक्षणात सहभागी होता येणार आहे. हे प्रशिक्षण शीव येथील लायन एम. पी. भुता हायस्कूलमध्ये होणार आहे, सर्व संबंधित शिक्षकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.