मुंबई: सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेसला बैलाने धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आसनगाव येथे जालना-सीएसएमटी वंदे भारतमध्ये ब्रेक बायडिंग झाले. त्यामुळे बराच वेळ आसनगाव येथे वंदे भारत थांबली होती.

सीएसएमटी-जालना मार्गावर १ जानेवारीपासून नवीकोरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. ‘ऑटोमॅटिक ब्रेकींग’ यंत्रणेमुळे वंदे भारत एक्सप्रेस विनाइंजिन घाटातून प्रवास करू शकते. मात्र मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ब्रेक बायडिंग झाल्याने आठगाव – आसनगावदरम्यान वंदे भारत रखडली. त्यामुळे लोकल सेवा कोलमडली.

हेही वाचा… तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे खोळंबली; कार्यालयात पोहोचण्यास कर्मचाऱ्यांना विलंब

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर ३० ते ४० मिनिटांनी वंदे भारत मार्गस्थ झाली. वेगवान प्रवास अशी वंदे भारतची ओळख असली तरीही तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जादा पैसे मोजूनही वेळेत प्रवास न झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी सकाळी १०.१८ च्या कसारा – सीएसएमटी जलद लोकलच्या पुढे नेहमीप्रमाणे जालना – सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस मार्गस्थ झाली. तर, आठगाव – आसनगावदरम्यान वंदे भारतमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली, असे एका प्रवाशाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईहून १३ जानेवारी रोजी जालन्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला एका बैलाला धडक दिल्याची गंभीर घटना घडली. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसचा दर्शनी भाग चेपला. तसेच काही भाग तुटला. या अपघातामुळे वंदे भारत एक्सप्रेसचा पाऊणतास खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.