मुंबई : राज्यात जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद मंगळवारी हवामान विभागाने केली. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा जोर पुन्हा वाढल्याने जळगावमधील तापमान ५.३ अंशापर्यंत घसरले आहे. तसेच येथील किमान तापमान सरासरीपेक्षा ७ अंशाने कमी झाल्याची नोंद झाली आहे. तसेच मुंबईतील किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना पुन्हा हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १७ अंश आणि कुलाबा येथील किमान तापमान २० अंश नोंदवण्यात आले. 

वर्षांरंभी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गारठा जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर काही प्रमाणात पुन्हा हवामान उष्ण-थंड झाले होते. मात्र आता किमान तापमानात प्रचंड घसरण झाली असून सरासरीपेक्षा तापमान कमी झाल्याने राज्यभरात गारवा पसरला आहे. मंगळवारी राज्यात सर्वात नीचांकीचे तापमान जळगाव येथे नोंदवण्यात आले, तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकरांना सौम्य उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता येथील तापमानात घट झाल्याने पुन्हा थंडीची जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे.

 उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट राज्याकडे वळल्याने राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर भारतातून येणारे अतिथंड वारे राज्यात खानदेश, विदर्भ आणि मराठवाडय़ात येत असून या भागातील जिल्ह्यांमधील किमान तापमानात मोठी घट नोंदवली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगावसह धुळे, निफाडमध्ये राज्याचे हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगावात रविवारी ११ अंश सेल्सिअसवर असलेला पारा सोमवारी अवघ्या पाच अंशांवर आला. मंगळवारीही पहाटेपासून गारठा कायम आहे. यंदाच्या हिवाळय़ात प्रथमच तापमानात एवढी घसरण झाली असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील तापमान १५ अंशाखाली जाण्याची शक्यता

मुंबईत किमान तापमान १७ अंशावर आले असून येत्या दोन दिवस किमान तापमान १६ ते १८ अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे. मकरसंक्रांतीच्या दरम्यान म्हणजे साधारण १४ ते १६ जानेवारीदरम्यान मुंबईतील तापमान १५ अंशाखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच, येत्या आठवडय़ात तापमानात आणखी घट होऊ शकते. तसेच, डहाणू, पालघर, अलिबाग येथील किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. तर, दक्षिण कोकणातील तापमान १८ ते २० अंशांदरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी वर्तवली.