मुंबई : क्रॉफर्ट मार्केट परिसरात वास्तव्यास असलेल्या एका ४० वर्षीय अविवाहित महिलेच्या पोटातून तब्बल १० किलो ४०० ग्रॅम वजनाचा गोळा काढण्यात सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. संपूर्ण पोटामध्ये पसरलेल्या या गोळ्यामुळे महिलेचे आतडे, फुफ्फुस, यकृत, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर दाब पडत होता. डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्यामुळे या महिलेला जीवदान मिळाले.

कॉफर्ट मार्केट येथील सीताराम इमारत परिसरात वास्तव्यास असलेल्या मीना सोलंकी (४०) यांच्या पोटाला दीड वर्षापूर्वी एका टेबलचा कोपरा लागला होता. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागले होते. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे त्यांना काही काळ आराम मिळत होता. मात्र हळूहळू त्यांच्या पोटात अधिकच दुखू लागले. तसेच त्यांच्या पोटाचा आकारही वाढू लागले. यामुळे त्यांना मासिक पाळीचाही त्रास सुरू झाला. दिवसेंदिवस पोट वाढत होते. अविवाहित असतानाही गरोदर असल्यासारखे पोट वाढत असल्याने त्या प्रचंड तणावाखाली आल्या होत्या. मात्र त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडेच उपचार सुरू ठेवले होते.

काही महिन्यांपासून त्यांना खाल्ल्यावर त्रास होऊ लागला. मे महिन्यामध्ये त्यांना तोंड आल्याने कोणतेही पदार्थ खाणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांचे जेवणही बंद झाले. त्यानंतर सलग आठ दिवस त्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्या दिवसेंदिवस अशक्त होऊ लागल्या होत्या. अखेर एका समाजसेवकांच्या मदतीने त्यांच्या भावाने त्यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचारासाठी आणले. उपचारादरम्यान त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्यांच्या पोटात भला मोठा मांसाचा गाेळा आढळला. त्याने पोटात व्यापलेल्या जागेमुळे आतडे, फुफ्फुस, यकृत, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब पडला होता. तो पोटातील अवयवांना चिकटला होता. तसेच मासांचा गोळा फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया करणे फारच गुंतागुंतीचे होते.

शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. मात्र सेंट जॉर्जेस रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तब्बल चार तास चालेल्या या शस्त्रक्रियेतून डॉ. राजश्री कटके यांनी महिलेच्या पोटातून तब्बल १० किलो ४०० ग्रॅम वजनाचा गोळा बाहेर काढला. या शस्त्रक्रियेमध्ये त्यांना ऑन्काेसर्जन डॉ. कोरेश, डॉ. शुभांगी आणि भूलतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा सोनकांबळे आणि डॉ. रूची यांनी मदत केली.

शस्त्रक्रियेनंतर दोन दिवस सोळंकी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना प्रथिनयुक्त आहार देण्यास सुरुवात करण्यात आली. आता त्या जेवण जेऊ लागल्या आहेत. तसेच रुग्ण कक्षामध्ये त्या फिरूही लागल्या आहेत.

माझी बहीण जगेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र मरणाच्या दारात असलेल्या माझ्या बहिणीला डॉक्टरांनी जीवदान दिले. त्यामुळे सेंट जॉर्जेस रुग्णालयातील डॉक्टरांचे आम्ही आभारी आहोत.

रमेश सोलंकी, रुग्ण मीनाचा भाऊ

रुग्णाला सततची पोटदुखी आणि श्वास घेण्यास होत असलेल्या त्रासामुळे शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि जटील होती. रुग्णाची शस्त्रक्रियेची मानसिकता नसल्याने प्रथम तिचे समुपदेशन करण्यात आले. तसेच तिच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेविषयी कल्पना देण्यात आली. वैद्यकीय पथकाच्या सहकाऱ्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाॅ. राजश्री कटके, प्राध्यापक व स्त्री रोग तज्ज्ञ, सेंट जॉर्जेस रुग्णालय