मुंबई : लोकशाही आणि स्वातंत्र्याची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दादर येथील आंबेडकर भवनात केली.

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही आणि निवडणुकांच्या वेळी जागावाटपाबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट करीत ठाकरे यांनी ‘‘हिंमत असेल, तर लगेच निवडणुका घ्या, आम्ही पराभव करून दाखवू,’’ असे आव्हान भाजपला दिले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या युतीची घोषणा दोन्ही पक्षांनी केली. राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी आहे. आमचे दोघांचे आजोबा म्हणजे राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर युतीची वाटचाल होईल. देशहित आणि तळागाळातील जनतेसाठी हे नवे नाते आणि नवा रस्ता आम्ही निवडला आहे, असे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप

‘‘आम्ही भाजपशी हिंदूत्वासाठी युती केली. वटसावित्री व्रताप्रमाणे युतीत प्रामाणिक राहिलो, पण भाजपने पीडीपी आणि अन्य पक्षांबरोबर बाहेरख्यालीपणा केला, हे कोणत्या हिंदूत्वात बसते,’’ असा सवाल ठाकरे यांनी केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपले जुने भांडण असले, तरी सर्व काही बाजूला ठेवून त्यांनीही एकत्र यावे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.

सध्याच्या राजकारणातील वाईट चाली आणि परंपरांना मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जनतेला भ्रमात आणि कोणत्या तरी वादात अडकवून ठेवून आपले उद्दिष्ट साधायचे, जनमानसाच्या जीवनमरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, अशा पद्धतीने देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. पंतप्रधान मोदी नुकतेच मुंबईत आले होते, त्यांच्या सभेला कोण आणि कोठून आले होते? निवडणुका आल्यावर गरिबांचा उदो उदो करायचा आणि त्यांचे मतदान घेतल्यावर त्यांना रस्त्यावर सोडायचे आणि आपली उड्डाणे सुरू करायची, हे प्रकार रोखण्याची गरज आहे. या वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि राज्यघटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाद जुना असल्याने वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होईल का, असे विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आमचेही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी तीन वर्षांपूर्वी संबंध कसे होते, हे जगजाहीर आहे. पवार यांचा काही भरवसा नाही, असे आमचे त्यावेळचे मित्र आम्हाला सांगत होते. पण त्यावेळच्या मित्रांनीच आमचे घर फोडले. दुसऱ्याचे घर फोडून आपले घर सजविणाऱ्यांची ही अवलाद आहे. त्यांना गाडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचे ठरविले आहे.’’

भाजपकडून फसवणूक झाल्यावर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून अडीच वर्षे सरकार चालवून दाखविले. तेव्हाही आम्ही कसे एकत्र येणार, याविषयी अनेकांना शंका होती, आरोपही झाले. आताही वंचितबरोबर युती करण्यापूर्वी माझी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा झाली आहे. त्यांची युतीला कोणतीही हरकत नाही. आपल्या मित्रपक्षांना आपण सांभाळायचे, असे ठरविले आहे. जागावाटपाबाबत निवडणुकीच्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘‘आज दुर्दैवाने अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) वापर करून देशातील राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न होत आहे. एखाद्याने गुन्हा केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर न्यायालयात आरोपपत्र दाखल होऊन शिक्षा व्हावी. पण न्यायालयात जायचे नाही आणि नेतृत्वावर फक्त आरोप करून चारित्र्यहनन करायचे, हा प्रकार सुरू आहे. निवडणूक बदलांसाठी आम्ही चळवळ सुरू केली. मित्रपक्षांनी ती गिळंगृत करण्याचा प्रयत्न करूनही आम्ही सुरू ठेवली,’’ असे अॅड. आंबेडकर म्हणाले.

शिवसेनेचे हिंदूत्व अबाधित : ठाकरे
शिवसेनेने भाजपशी हिंदूत्वासाठी युती केली होती. आम्ही प्रामाणिक राहूनही त्यांनी फसवणूक केली. त्यांच्याबरोबर राहिलो, तर हिंदूत्ववादी आणि अन्य कोणाबरोबर गेलो तर हिंदूत्वविरोधी, हे भाजपच्या सोयीनुसार ठरते. भाजपने पीडीपी आणि इतरांना सत्तेसाठी साथ दिली, पण आमची हिंदूत्वाची, माणुसकीची भूमिका आजही कायम आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांशी जुना वाद : आंबेडकर
शिवसेना-वंचित आघाडी युतीबाबत मला काही माहीत नाही, मी या भानगडीत पडत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याविषयी विचारता प्रकाश आंबेडकर म्हणाले, पवार यांच्याशी माझे शेतातील भांडण नाही, तर ते नेतृत्व आणि दिशा याबाबतचे जुने भांडण आहे. पुढील काळात जुने सर्व काही विसरून पवार आमच्याबरोबर येतील, अशी मला आशा आहे.

‘राष्ट्रीय हिताच्या राजकारणास प्राधान्य’
देशात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून अन्य विषयांना महत्त्व दिल्यास स्वातंत्र्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही, तर देशात अराजक निर्माण होईल, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळतीजुळती आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनीही धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता आणि राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत, असे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सध्याच्या राजकारणातील वाईट परंपरा मोडून काढण्यासाठी, वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

आता भांडवलशाही आणि लुटारूंची सत्ता आहे. त्यामुळे उपेक्षितांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याने ही युती आम्ही केली आहे. – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी