मुंबई : वाळकेश्वर येथील जब्रेश्वर महादेव मंदिरात सोमवारी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरती केली. तसेच मनसेच्या नेत्यांनीही परिसराला भेट दिल्याने येथील आरतीच्या वादाला राजकीय रंग चढले आहेत. जब्रेश्वर मंदिरात दर सोमवारी होणाऱ्या आरतीविरोधात स्थानिक गृहनिर्माण संकुलांतील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाला मराठी-अमराठी वादाचे स्वरूप आले होते. प्रत्यक्षात आरती करणारे सर्वभाषिक असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

वाळकेश्वर बाणगंगा परिसराला लागूनच जब्रेश्वर महादेव मंदिर असून, १८४० मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली होती. येथे दर सोमवारी रात्री ९ ते ९.३० या वेळेत नगाडा व शंखाच्या नादात आरती केली जाते. परंतु यामुळे होणारा आवाज, आरतीसाठी येणाऱ्या भाविकांच्या दुचाकींविरोधात स्थानिक गृहसंकुलांतील काही रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क करून तक्रारी केल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत वाद सुरू होता. दीड महिन्यापूर्वी झालेल्या तक्रारीनंतर स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना बोलावून वाद मिटवला होता. परंतु आता महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

वर्षभरापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी येथील आरतीविरोधात मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनीद्वारे तक्रारी आल्या होत्या. दीड महिन्यापूर्वी स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्तांनीही याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूच्या मंडळींना बोलावले होते. तेव्हापासून हा वाद शांत झाला होता. परंतु अचानक राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतल्यामुळे हे प्रकरण नाहक चिघळण्याची चिन्हे आहेत.

मनसेची वादात उडी

शिवसेनेपाठोपाठ मनसेनेही आरती वादात उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी रात्री येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली. स्थानिक गुजराती, मारवाडी भाषकांकडून आरतीबद्दल तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे हे प्रकरण सोडवण्यासाठी आपण तेथे भेट दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

दरसोमवारी होणाऱ्या आरतीविरोधात स्थानिक गृहसंकुलांतील रहिवासी तक्रारी करीत आहेत. यामध्ये अमराठी व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आम्ही येथे महाआरतीचे आयोजन केले. – संतोष शिंदे, दक्षिण मुंबई विभागप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरतीचा हा वाद दीड महिन्यापूर्वीच मिटला आहे. येथील आरतीविरोधात सर्वाधिक तक्रारी एका मराठी महिलेनेच केल्या आहेत. त्यामुळे येथे कोणताही मराठी-अमराठी वाद नाही, अमराठी भाविकही मंदिरात आरती करतात. – कल्पेश कोकाटे, भाविक