पर्यायात आर्थिक मोबदल्याचाही समावेश
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पात बोरिवलीतील मागाठाणे येथील ५७२ झोपड्या बाधित होत आहेत. एमएमआरडीएने या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी आता तीन पर्याय दिले आहेत. त्यानुसार झोपडीधारकांना आर्थिक मोबदला, स्थायी निवासस्थान आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसन असे ही तीन पर्याय देण्यात आले आहेत. या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निश्चित करून त्यासंबंधीचा लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन एमएमआरडीएने झोपडपट्टीवासियांना केले आहे.
ठाणे – मुंबई अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला मागील काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पातील मागाठाणे येथील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही. मागाठाणे येथे लाॅन्चिंग शाफ्टचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक असून यासाठी बाधित होणार्या सर्व झोपड्या हटविणे गरजेचे आहे.
बाधितांच्या पुनर्वसनासाठी आता तीन पर्याय दिल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. या माहितीनुसार मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, एस.आर.ए. प्रकल्पातील, तसेच रस्त्यालगतच्या पदपथावरील अंदाजे ५७२ झोपड्या बाधित होत आहेत. या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मोबदला, स्थायी निवासस्थान आणि झोपु योजनेअंतर्गत पुनर्वसन असे तीन पर्याय देण्यात आले आहेत.
एमएमआरडीएच्या आर्थिक मोबदल्याच्या धोरणानुसार प्रकल्पबाधितांना त्यांच्या बाधित होणार्या झोपड्यांच्या क्षेत्रफळानुसार आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. तर एमएमआरडीएमार्फत बोरिवली इंटीग्रेटेड वसाहतीमधील सदनिका व मिरा-भाईंदर येथील भाडेतत्वावरील गृहयोजनेतील मे. गुजरात व सोनम इंटरप्राईझेस यांनी विकसित केलेल्या सदनिका प्रकल्पबाधितांच्या मागणीनुसार स्थायी निवासस्थान म्हणून उपलब्ध करण्यात येणार आहेत.
तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून मे. भारद्वाज विकासकामार्फत राबविण्यात येणार्या झोपु योजनेत प्रकल्पबाधितांना समाविष्ट करण्याचाही पर्याय आहे. झोपु योजनेअंतर्गत विकासकाकडून पुनर्वसित इमारतीत बाधितांना कायमस्वरूपी घरे दिली जातील. तर पुनर्वसित इमारत तयार होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात त्यांना घरभाडे वा सदनिका दिली जाणार आहे.
यापैकी कोणताही एक पर्याय निवडून प्रकल्पबाधितांनी त्यासंबंधी लेखी अर्ज सादर करावा. असे आवाहन एमएमआरडीएने बाधितांना केले आहे. अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी बाधितांना उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांच्याशी मोबाइल क्रमांक ०२२२६५९७४९४ वर संपर्क साधता येईल, असेही एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले आहे. बाधितांच्या अर्जांनुसार पुढील कार्यवाही करून पुनर्वसन मार्गी लावण्यात येणार आहे.