ठाण्यातील आराधना चित्रपटगृहाजवळ एसटी स्थानकासाठी आरक्षित असलेला भूखंड ताब्यात न घेण्याबाबत महामंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल. तसेच कोणा बिल्डरच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असेल तर दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा मोकळा भूखंड बिल्डराच्या हितासाठी आरक्षणमुक्त करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना रावते यांनी ही माहिती दिली. याबाबत सखोल चौकशी करून बुधवारी सभागृहात निवेदन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता अतिरिक्त बस स्थानकांसाठी या भूखंडाची आवश्यकता असून त्यात परिवहनमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे, असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले.
२९०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड महापालिका विकास आराखडय़ात एसटी स्थानकासाठी आरक्षित असून तो ताब्यात घेण्याची नोटीस जागामालकाने एसटी महामंडळास बजावली आहे. त्यावर एसटीच्या मालकीची ठाण्यात तीन स्थानके असून ती पुरेशी असल्याने आता खासगी जागा संपादित करू नये, असा निर्णय महामंडळाने घेतला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.